नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाची जोरदार मोर्चेबांधणी
अनगरकर - पाटील परिवार आणि मोहोळच्या क्षीरसागर परिवारातील राजकीय जवळीक वाढली
शितल क्षीरसागर यांच्या उमेदवारीबाबत वरिष्ठ स्तरावरून सकारात्मक संकेत
मोहोळ (साहिल शेख):- एकेकाळी हिंदी चित्रपट सृष्टीतील जुन्या काळात गाजलेला खूप मोठा डायलॉग अलीकडच्या काळात देखील अधून मधून सर्वांनाच आठवतो तो म्हणजे "भाई इतना सन्नाटा क्यू है" काहीशी अशीच अवस्था भारतीय जनता पक्षाच्या पॅनलच्या विरोधातील सर्वच विरोधकांची झाली आहे. भारतीय जनता पक्षाने सर्वात अगोदर बैठक घेऊन नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले. साहजिकच या बैठकीला स्वतः ज्येष्ठ नेते राजन पाटील होते. शिवाय राजन पाटील भाजपात आल्यानंतरची ही पहिलीच बैठक होती त्यामुळे गर्दी असणे साहजिक होते. मात्र या बैठकीनंतर सर्वांच्या लक्षात एक गोष्ट आली की भाजपा मोहोळ नगरपरिषद ही स्वबळावर लढवणार म्हणजे लढवणारच. त्यांनी महायुती म्हणून अन्य सोबतच्या घटक पक्षांशी कसलाही संपर्क न ठेवता शत प्रतिशत भाजपा या धोरणाने ही निवडणूक राष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गाजलेले कमळ चिन्हावरच लढवण्याची तयारी जवळपास पूर्ण करत आणली आहे.
दोनच दिवसांपूर्वी भाजपचे यापूर्वीचे जिल्हाध्यक्ष अक्कलकोट मतदार संघाचे दक्ष आमदार आणि जिल्ह्याच्या भाजपचे सर्वेसर्वा सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त अनगरकर - पाटील परिवाराकडून शुभेच्छा देण्यासाठी सिनेट सदस्य अजिंक्यराणा राजन पाटील हे स्वतः उपस्थित होते. यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा शहरातील भाजपाचे युवा नेते सुशीलभैय्या क्षीरसागर आणि नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेले त्यांचे बंधू सोमेश क्षीरसागर हे देखील होते. क्षीरसागर बंधू समवेतचे अजिंक्यराणा पाटील यांचे समवेतचे क्षीरसागर बंधूंचे फोटो सोशल मीडियावर तर वायरल झालेच मात्र भारतीय जनता पक्षाच्या ग्रुपवर सर्वत्र शेअर झाल्यामुळे अनगरकर - पाटील आणि मोहोळचे क्षीरसागर यामधील राजकीय जवळीक निश्चितपणे या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढल्याचे जाणवत आहे.
चौकट
भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी अगदी पहिल्या दिवसापासून ते आजतागायत शितल सुशील क्षीरसागर यांच्याच नावाची संपूर्ण शहरभर चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाने या नावाला हिरवा कंदील दिल्याचे तूर्तास जरी स्पष्ट नाही केले असले तरी अन्य कोणत्याही उमेदवाराची इतक्या प्रमाणात वरिष्ठ पक्ष स्तरावर पूर्व चाचपणी आणि चर्चा नसल्यामुळे आता शितल क्षीरसागर नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारीच्या प्रबळ दावेदार असल्यावर जणु शिक्कामोर्तब होत आहे.
शितल क्षीरसागर या उच्चशिक्षित आणि युवा उमेदवार म्हणून भाजपाचा नगराध्यक्ष पदाचा प्रभावी चेहरा म्हणून रिंगणात उतरवल्या जाऊ शकतात. शिवाय क्षीरसागर परिवाराला यापूर्वी अनेक राजकीय निवडणुकांचा पूर्वाश्रमीचा दांडगा अनुभव असल्यामुळे शीतल यांची उमेदवारी भाजपाच्या दृष्टीने जमेची बाब ठरणार आहे.

0 Comments