सुधीर खरटमल यांचा अजित पवार गटात प्रवेश
मुंबई (कटूसत्य वृत्त):-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी (ता. 06 नोव्हेंबर) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुधीर खरटमल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून धूसफूस सुरू होती. त्यातूनच खरटमल यांनी आज उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घड्याळ हाती बांधले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले सुधीर खरटमल यांनी 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर त्यांच्यावर सोलापूर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, नेतेमंडळींचा भरणा असणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र मतभेद निर्माण झाले होते. सोलापूर शहराच्या संघटनेत एकीऐवजी बेदिलीच दिसून येत होती.
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळलेले सुधीर खरटमल यांनी शरद पवार यांनी नुकतेच बोलावलेल्या बैठकीला दांडी मारली होती. त्यांनी आपला कार्यकर्ता बैठकीला पाठवला होता. विशेष म्हणजे तो कार्यकर्ता हा पूर्वाश्रमीचा भाजपचा कार्यकर्ता होता. पण आपल्या जवळचा कार्यकर्ता म्हणून खरटमल यांनी त्याला पक्षाच्या बैठकीला पाठविले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापुरातील नेतेमंडळी चांगलीच भडकले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापुरातील पदाधिकाऱ्यांनी खरटमल यांची शरद पवार यांच्याकडे तक्रारही केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी बारामती येथील गोविंदबागेत जाऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे खरटमल यांच्याबाबत गाऱ्हाणे मांडले होते. त्यामुळे तडकाफडकी होणाऱ्या पक्षांतर्गत घडामोडींमुळे खरटमल हे पक्षात नाराज होते.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सुधीर खरटमल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह सोलापूर शहराध्यक्ष संतोष पवार, किसन जाधव हे उपस्थित होते.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधीर खरटमल यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसला असून त्यामुळे नव्या शराध्यक्षांवर थेट महापालिका निवडणुकीचा भार येऊ पडणार आहे, त्यामुळे खरटमल यांच्या जागी शहराध्यक्ष म्हणून कोणाची निवड होते, हे पाहावे लागणार आहे.

0 Comments