माजी जि.प. सदस्य शुभांगी क्षीरसागर यांचा प्रवेशाने शिवसेना शिंदे गटाचे पारडे जड
मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला असून भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का देणारी घटना घडली. मोहोळच्या माजी जिल्हा परिषद सदस्य शुभांगी नागनाथ क्षीरसागर व त्यांचे पती नागनाथ क्षीरसागर यांनी भाजपला रामराम ठोकत थेट शिवसेना (शिंदे गट) प्रवेश केला. त्यामुळे प्रभाग क्रमांक ५ मधील उमेदवार चंद्रकांत भगवान वाघमोडे व राधाबाई युवराज कांबळे यांना पाठिंबा दिल्याने पारडे जड झाले असून या प्रभागात धनुष्य बाण च निवडून येणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
क्रांती भवन, मोहोळ येथे शिवसेना ओबीसी समाज प्रदेश प्रमुख रमेश बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षीरसागर दाम्पत्याने जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर त्यांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला.
"जुने भाजप कार्यकर्ते दुय्यम… नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली नाही" नाराजीचा सूर. नागनाथ क्षीरसागर यांनी भाजप सोडण्यामागील कारणे स्पष्ट करताना भाजपवर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले, “जुन्या भाजप कार्यकर्त्यांना सन्मानजनक वागणूक मिळत नाही.”
“एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात सर्व जाती-धर्मांच्या कार्यकर्त्यांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळते.” या कारणांमुळे आम्ही पत्नी-पती शिवसेना (शिंदे गट) प्रवेश करत असल्याचे त्यांनी माध्यमांसमोर जाहीर केले.
मोहोळ नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना क्षीरसागर दाम्पत्याचा भाजपातून बाहेर पडून शिंदे गटात प्रवेश ही भाजपसाठी मोठी राजकीय हानी मानली जात आहे. स्थानिक पातळीवर क्षीरसागर यांचा प्रभाव लक्षात घेता त्यांचा निर्णय निवडणुकीवर परिणाम करू शकतो. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी धक्का समजला जातो.
या कार्यक्रमाला मोहोळ शहराचे ज्येष्ठ नेते पद्माकर आप्पा देशमुख, रमेश बारसकर, ऍड. विनोद कांबळे. चंद्रकांत वाघमोडे यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्षीरसागर यांच्या पक्षांतरामुळे मोहोळमधील राजकीय समीकरणे आता नव्याने मांडली जातील, हे स्पष्ट झाले आहे. आगामी निवडणुकीत या बदलाचा कोणत्या पक्षाला फायदा आणि कोणाला तोटा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
.jpg)


0 Comments