Hot Posts

6/recent/ticker-posts

आंदोलकांनी गव्हाणीत उतरून कारखाना केला बंद

 आंदोलकांनी गव्हाणीत उतरून कारखाना केला बंद





बार्शी (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात उसदराच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांचा रोष धगधगू लागला आहे. ऊसाला पहिली उचल ४००० रुपये देण्याची मागणी आणि ऊस दर जाहीर न करता गाळप सुरू न करण्याचा इशारा देत शेतकरी संघटनेने आज निमजाई साखर कारखान्यात गव्हाणीत उतरून ठिय्या आंदोलन केले.
यामुळे कारखान्याचे गाळपकाम पूर्णतः ठप्प झाले.

शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली २० नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विविध मार्गांनी निवेदने देण्यात आली होती.
त्यात ऊसाचा दर जाहीर करणे, ओव्हरलोड वाहतूक रोखणे, काटामार बंद करणे, व मागील थकित बिले देणे. या मागण्या ठामपणे मांडण्यात आल्या होत्या. मागण्या न मानल्यास २३ नोव्हेंबरपासून आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला होता.

घोषणाबाजीच्या गजरात आज शेतकरी निमजाई कारखान्याच्या गव्हाणीत उतरले आणि प्रत्यक्ष ठिय्या देत कारखान्याला कुलूप लावण्यात आले. या आंदोलनात विजय रनदेवे, हनुमंत कापसे, उमेश यादव, मुसा मस्के, दत्ता कापसे, ज्ञानेश्वर पवार, किसन डिसले, दयानंद ढेंगळे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले.

हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा देत शंकर गायकवाड म्हणाले, “उस उत्पादनाचा खर्च आकाशाला भिडतोय. पण कारखानदार शेतकऱ्यांचा ऊस अक्षरशः फुकट भावात लुटत आहेत. हे तात्काळ थांबलेच पाहिजे.” तसेच त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले, “शेतकरी वैतागला तर परिस्थिती कारखानदारांना परवडणार नाही. संघर्ष टोकाला जाईल.”

Reactions

Post a Comment

0 Comments