अनाथांची माय सिंधुताई सपकाळ ची लेक मंगळवारी 25 नोव्हेंबरला सोलापुरात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी ‘सोलापूर आयकॉन पुरस्कार सोहळा व पुस्तक प्रकाशन’ हा भव्य कार्यक्रम मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर येथे मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. सोलापूरचा कर्तृत्वाचा ठसा राज्याच्या पलीकडे दृग्गोचर व्हावा आणि समाजासाठी समर्पितपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव व्हावा हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ‘सोलापूर आयकॉन’ या पुस्तकाचे प्रकाशन. या पुस्तकामध्ये सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, समाजसेवा, उद्योजकता, शेती, क्रीडा आणि कला या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रेरणादायी कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची जीवनयात्रा, संघर्ष आणि योगदानाचे प्रभावी वर्णन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या उज्ज्वल कामाची नोंद इतिहासात राहावी या उद्देशाने पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे कारण अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या आणि ‘ममता फाउंडेशन’च्या अध्यक्षा सौ. ममता सिंधुताई सपकाळ या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे, प्रा. तेजस्विनी कदम, उद्योजक संग्रामभैया भालके, सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष कविता घोडके, सिने अभिनेत्री शितल ढेकळे, सिने अभिनेत्री शिवानी सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात जिल्ह्यातील निवडक व्यक्तींना सोलापूर आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, त्यांच्या समाजहिताच्या कार्याचा गौरव केला जाईल. युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या या व्यक्तींच्या सन्मानामुळे समाजात सकारात्मक बदलांची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
सोलापूरकरांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

0 Comments