सोलापुरातील सात बड्या व्यावसायिकांवर आयकर विभागाची धडक कारवाई
९० अधिकाऱ्यांची ४० गाड्यांची फौज शहरात; गोपनीय हिशेबाच्या डायऱ्या जप्त
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- बुधवारी पहाटे अगदी सूर्य उगवण्याआधीच सोलापूर शहरात मोठी खळबळ उडाली. शहरातील सात नामांकित व्यावसायिक, सराफ व्यापारी आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील बड्या व्यक्तींवर आयकर विभागाने एकाचवेळी धाड टाकत मोठी कारवाई केली. ९० आयकर अधिकारी, ४० वाहनांचा ताफा, अत्याधुनिक तांत्रिक टीम आणि गुप्त योजना या सर्वांच्या साहाय्याने आयकर विभागाने अत्यंत गोपनीय आणि काटेकोर सर्च ऑपरेशन राबवले.
या कारवाईत प्रसिद्ध सराफ व्यापारी आपटे, त्यांचे भागीदार वेणेगुरकर व कोळी, हेरिटेजचे मनोज शहा, किमया कन्स्ट्रक्शनचे समीर गांधी, सराफ व्यापारी नारायण पेठकर, आणि ॲड. उमेश मराठे या सात व्यावसायिकांच्या घरे, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांवर धाडी टाकण्यात आल्या.
■ विजयपूरमधून रात्रीच ‘ऑपरेशन सोलापूर’ सुरू
आयकर विभागाच्या पथकांनी मंगळवारी रात्री विजयपूर येथे मुक्काम करून ‘ऑपरेशन सोलापूर’ची आखणी केली. पहाटे ३ वाजता ‘तीर्थयात्रेचे स्टिकर्स’ लावलेल्या वाहनांतून पथक सोलापूरकडे रवाना झाले.
सकाळी ६ वाजता शहरात पोहोचताच धाड सुरू झाली. स्थानिक पोलिस पथके सुरक्षा म्हणून सोबत होती.
■ २० तास सलग चौकशी; गोपनीय डायऱ्या आणि कागदपत्रे जप्त
धाडीनंतर अधिकारी संबंधितांच्या घरी, व्यावसायिक ठिकाणी आणि कार्यालयांमध्ये बसून सात ते आठ वर्षांतील व्यवहारांची छाननी करत होते.
या तपासात गोपनीय हिशेबाच्या डायऱ्या, कॅश ट्रान्झॅक्शनशी संबंधित कागदपत्रे, रिअल इस्टेटमधील व्यवहारांची नोंद अशी महत्त्वाची सामग्री जप्त झाली असल्याचे सूत्रांचे सांगणे आहे.
धाडी दरम्यान, बाहेरील कोणालाही घरात किंवा दुकानात प्रवेश नाही, सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग, अधिकाऱ्यांनी दोन वेळचे जेवण जागेवरच केले, रात्री ११ वाजेपर्यंत चौकशी सुरूच होती.
■ करचोरीचे गंभीर संकेत; २००% दंडाची शक्यता
अधिकाऱ्यांच्या मते, अनेकांनी समोर दिसणाऱ्या व्यवसायाच्या आडून रिअल इस्टेट व्यवहारांद्वारे मोठ्या प्रमाणात कर चुकवला.
काळा पैसा सोन्या-चांदीत आणि प्रॉपर्टीमध्ये बदलण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत.
करचोरी आढळल्यास मूळ कररक्कम, त्यावरील व्याज, २०० टक्क्यांपर्यंत दंड, अशी मोठी वसुली होऊ शकते.
यासाठी आयकर विभागाबरोबर सॉफ्टवेअर तज्ञ आणि आयटी इंजिनिअरही पथकात उपस्थित होते.
■ CA ना प्रवेश नाकारला; मोठ्या स्वच्छताचौकशीचे सिग्नल
धाडीनंतर अनेकांनी तातडीने आपापल्या ‘सीए’ना बोलावले; मात्र आयकर अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवेश दिला नाही. प्राथमिक चौकशी आणि जबाब नोंदविल्यानंतरच अधिकाऱ्यांनी सल्लागारांशी संवाद साधला. टॅक्स चोरीची रक्कम मोठी असल्याचे संकेत मिळत असून आजही (गुरुवारी) चौकशी सुरू राहण्याची शक्यता व्यक्त होते.
■ आपटे आणि भागीदारांच्या सर्व आस्थापनांवर धाड
सराफ व्यवसायातील मोठे नाव असलेल्या आपटे यांच्यावर टॅक्स चुकवण्याचा गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे. पुणे आणि सोलापुरातील त्यांच्या दोन सराफ दुकाने, रिअल इस्टेट प्रकल्प, अंत्रोळी येथील दूध डेअरी सर्व ठिकाणी धाड टाकण्यात आली.
■ समीर गांधींच्या कुटुंबात विवाह; घरात चिंतेचे वातावरण
किमया कन्स्ट्रक्शनचे समीर गांधी यांच्या कुटुंबात रविवारी विवाह सोहळा असून अचानक पडलेल्या धाडीत संपूर्ण कुटुंब तणावाखाली आहे.
■ धाडीतल्या प्रमुख गोष्टी (ठळक मुद्दे)
विजयपूरमध्ये अधिकाऱ्यांचा मुक्काम; तिथून पहाटे सोलापूरकडे ‘सुरक्षित’ प्रस्थान, ४० गाड्यांचा ताफा; ९० अधिकारी, शहरातील ७ बड्या व्यक्तींच्या घरी व व्यावसायिक ठिकाणी एकाचवेळी कारवाई, तब्बल १८–२० तास सलग तपास, गोपनीय डायऱ्या, व्यवहार नोंदी, कागदपत्रे जप्त, रिअल इस्टेट व दागिन्यांमधून झालेल्या कथित काळ्या पैशाची चौकशी, सीएना प्रवेश नाकारला, उद्याही चौकशी चालू राहण्याची शक्यता
या धाडीनंतर सोलापूरच्या व्यावसायिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून आगामी काही दिवसांत आणखी काही कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0 Comments