Hot Posts

6/recent/ticker-posts

महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार- अण्णा बनसोडे

 महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार- अण्णा बनसोडे




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यात अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये आहे. शिवाय पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरातील सर्व २६ प्रभागात १०२ जागा लढवून किमान ७५ जागा जिंकून सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त करत काही ठिकाणी भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजितदादा पवार राष्ट्रवादीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी सांगितले.
   सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांचे तीन दिवसाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी सोलापुरात आगमन झाले. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बनसोडे यांनी महानगरपालिका स्वबळावर घडविणार असल्याचे सांगितले.
   राष्ट्रवादी काँग्रेस राज्यामध्ये शिंदे गट व भारतीय जनता पार्टी सोबत एकत्र असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मात्र मूळचे पक्षाचे कार्यकर्ते आणि पक्षात प्रवेश केलेले पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामुळे उमेदवारांची संख्या निश्चितच वाढते. असे असले तरी ज्या ठिकाणी जास्त नगरसेवक त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत,असे गणित घातले जाणार आहे. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर निवडणूक लढविणार असली तरी सच्चा कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण उभारणार असून प्रामाणिक कार्यकर्त्यांनाच महापालिका निवडणुकीत उमेदवारी देणार असल्याचेही सहसंपर्क मंत्री बनसोडे यांनी सांगितले.
   भाजप सत्तेत असतानासुद्धा सोलापूर शहराचा मागील पाच वर्षात अपेक्षित असा विकास झालेला नाही.रस्ते,झोपडपट्टीचा विकास म्हणावा तसा झालेला नाही. भाजपा जसे इनकमिंग आहे,तसेच राष्ट्रवादी पक्षामध्ये सुद्धा इनकमिंग आहे.त्यामुळे सध्या सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक आहेत. आगामी निवडणुकीत ती संख्या ७५ वर गेलेले दिसेल,आणि हाच सर्वात मोठा सोलापुरात बदल झालेला दिसेल, असेही अण्णा बनसोडे यांनी सांगितले.
  सोलापूर हे आपले अजोळ आहे, तर मोहोळ हे आपले जन्मस्थळ आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील कोणत्या भागाचा विकास झाला आणि कोणता भाग अविकसित राहिला ? याची आपल्याकडे परिपूर्ण माहिती आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी म्हणावा तसा विकास झाला नाही,त्या ठिकाणचा विकास करण्याबरोबरच संपूर्ण सोलापूर शहर एक विकासाचे मॉडेल कसे होईल,याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्राधान्य देणार असल्याचेही, सहसंपर्क मंत्री बनसोडे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.      सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकूण २६ प्रभागात पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रातील महिलांच्या आगामी तीन दिवसात भेटीगाठी घेण्यात येणार आहेत. सर्वांची मते जाणून घेणार आहोत. त्यानंतर "आपकी बार ७५ पार "चा दिलेला नारा यशस्वी करण्याचीसाठी मायक्रो प्लॅनिंग केले जाणार असल्याचेही बनसोडे यांनी सांगितले.
  या पत्रकार परिषदेला शहर- जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान,जेष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,आनंद  चंदनशिवे, महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर,चित्रा कदम, माजी नगरसेविका नूतन गायकवाड, माजी नगरसेवक गणेश पुजारी,प्रमोद भोसले,हेमंत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
==================
एमआयएमचे उर्वरित तीनही माजी नगरसेवक राष्ट्रवादीत  ?
==================
 सोलापुरात एमआयएम पक्षाचे एकूण ९ नगरसेवक होते. त्यापैकी ६ नगरसेवक ऑलरेडी अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षात आलेले आहेत. उर्वरित ३ जणांबरोबर बोलणे सुरू आहे. लवकरच ते तीनही माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येतील. त्यामुळे सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला  निवडणुकीत कोणाचे आव्हान असेल,असे बोलणे वावगे ठरणार नसल्याचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

 पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर सोलापूरचा विकास करणार !

 पुण्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आपण ३ वेळा नगरसेवक आणि १ वेळा स्थायी समितीचे सभापतीपद भूषवले आहे. तर तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेलो आहे. मागील २५ वर्षात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात काम करत आहोत.अजितदादांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिकेत ज्या पद्धतीने विकास झाला. त्याच धर्तीवर सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असे अण्णा बनसोडे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.मात्र त्यासाठी सोलापूर महापालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही बनसोडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments