Hot Posts

6/recent/ticker-posts

मालेगावातील कृत्याने महाराष्ट्र हादरला; राज्यातील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह — “गृह मंत्री राजीनामा द्या” - ॲड. शंकर चव्हाण

 मालेगावातील कृत्याने महाराष्ट्र हादरला; राज्यातील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह — “गृह मंत्री राजीनामा द्या” - ॲड. शंकर चव्हाण


पुणे (कटूसत्य वृत्त):- 
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रच सुन्न झाला आहे. 16 नोव्हेंबरला घडलेल्या या अमानुष प्रकाराने समाजातील प्रत्येक संवेदनशील नागरिकाच्या मनात संताप उसळला आहे. एका चिमुकलीची अब्रू लुटून तिचे डोके दगडाने ठेचून हत्या करणारा नराधम विजय संजय खैरनर (वय 24) याला पोलीसांनी ताब्यात घेतले असले तरी राज्याच्या प्रशासनाच्या अपयशावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती कोसळली असून राज्यात दररोज महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत चालले आहे.
अशा प्रकारच्या घटना थांबत नाहीत. दोषींना लगेच शिक्षा होत नाही. न्यायव्यवस्थेतील विलंब आणि प्रशासनातील निष्क्रियता यामुळे महिलांच्या सुरक्षेचे आश्वासन आज केवळ बोलण्यापुरतेच उरले आहे. मृत चिमुरडीचा मृतदेह घरी आणण्यात आला तेव्हा गावात आक्रोश माजला. मातापित्यांच्या डोळ्यातील वेदना, गावकऱ्यांच्या मनातील राग आणि असहाय्यता — या सर्वांनी राज्यातील असुरक्षिततेचे चित्र अधिक स्पष्ट केले.
प्राथमिक तपासात समोर आले की आरोपी विजय खैरनर आणि मुलीच्या वडिलांमध्ये काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता आणि त्याचा राग त्याने या नराधमी कृत्यातून काढला. या व्यक्तीने केवळ एका कुटुंबाचा संसार नाही तर संपूर्ण मानवतेचा मान मोडला आहे.
या भीषण घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करत ॲड. शंकर चव्हाण यांनी महाराष्ट्र सरकार आणि विशेषत: गृह मंत्र्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले —“महाराष्ट्रात गुन्हेगारी भडकली आहे. महिलांवरील अत्याचार दररोज वाढत आहेत. नवजात ते वृद्ध — कोणतीही महिला सुरक्षित नाही. एवढ्या घटना घडत असताना गृह मंत्री शांत का? कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरलेल्या गृह मंत्र्यांनी तात्काळ नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलाच पाहिजे.”
ते पुढे म्हणाले —“दोषी तुरुंगात जातात, पण भीती संपत नाही. गुन्हेगारांना संरक्षण मिळते, चौकशी ढिली होते, केस लांबतात आणि पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही. अशा व्यवस्थेला काय म्हणायचे? जर तीन वर्षांच्या चिमुरडीचंही रक्षण या सरकारला करता येत नसेल, तर ते शासन राखून काय उपयोग?”
ही घटना केवळ एका गावाची नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठा इशारा आहे. समाजात हिंसा आणि अत्याचार रोखण्यासाठी प्रशासन कठोर नाही, न्यायव्यवस्था वेगवान नाही आणि राजकीय इच्छाशक्ती तर जवळजवळ संपली आहे.
राज्याला आता बोलणाऱ्या आश्वासनांची गरज नाही, तर कठोर कारवाईची आवश्यकता आहे. अशी कृत्ये करणाऱ्यांना त्वरित, कठोर आणि आदर्श शिक्षा मिळाली पाहिजे — तेव्हाच भविष्यातील नराधमांना संदेश जाईल.महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी आणि महिलांचा सन्मान राखण्यासाठी राज्याने जागे व्हायला हवे — हा आवाज आता दाबला जाणार नाही.
दररोज महिलांवरील गुन्हे वाढत आहेत, मुली सुरक्षित नाहीत,आणि गृह मंत्री फक्त आश्वासनांवर…जर राज्यातील मुलींचं संरक्षण करता येत नसेल,तर गृह मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. अशी ॲड. शंकर चव्हाण यांनी महाराष्ट्र सरकार आणि विशेषत: गृह मंत्र्यांवर जोरदार टीका केली.
Reactions

Post a Comment

0 Comments