चाकूने वार करुन जोडप्यास लुटणारे दोघे जेरबंद; एक फरार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- फिरायला गेलेल्या जोडप्यातील मुलावर चाकूने वार करुन सोन्याची साखळी लुटणाऱ्या दोन आरोपींना विजापूर नाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी विजापूर नाका तसेच शहर गुन्हे शाखेचे पथक वीस दिवसांपासून परिश्रम घेत होते. आरोपींनी गुन्हा कबूल करण्यास प्रथम नकार दिला होता परंतु पोलिसी खाक्या दाखवून तसेच कुशलतेने तपास करुन या गुन्हयाचा तपास पोलिसांनी लावला.
२० ऑक्टोबर रोजी व्यंकटेश बुधले हा तरुण मैत्रिणीसोबत दुचाकीने विजापूर रोडवरील हॉटेल आदित्यजवळ आला असता तिथे तीन जणांनी त्यांना अडवले. आरोपींनी व्यंकटेशवर चाकूने वार करत त्याच्या मैत्रिणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी लुटून पोबारा केला. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती.
तपासादरम्यान तयार करण्यात आलेल्या रेखाचित्राच्या आधारे पोलिसांना आरोपींचा मागोवा घेता आला. पोलिसांच्या कुशल तपासानंतर विकी दशरथ गायकवाड (वय २५, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी, सोलापूर) आणि विनोद उर्फ रावण शावरप्पा गायकवाड (वय २५, रा. होटगी, ता. द. सोलापूर) यांना अटक करण्यात आली. तर तिसरा आरोपी जगदीश उर्फ बारक्या संगटे (रा. मोदी, सोलापूर) फरार आहे.
या लुटीत वापरण्यात आलेली सोन्याची साखळी, चाकू आणि मोटारसायकल असा एकूण १ लाख ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासात विकी गायकवाड याच्या विरोधात ११ गुन्हे, तर विनोद गायकवाड याच्या विरोधात ४ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले.
आरोपी सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते; मात्र पोलिसांनी दाखवलेल्या खाक्यापुढे त्यांना गुन्हा कबूल करावा लागला. या आरोपींवर *मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव* पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली.
ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलिस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादा गायकवाड आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.
0 Comments