जाज्वल इतिहासाच्या प्रेरणेतूनच समृद्ध भारताची निर्मिती शक्य- पाटील
सोलापूर, (कटूसत्य वृत):- स्वातंत्र्योत्तर आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील घटनांचा आढावा घेता त्यामधील प्रेरणास्थाने शोधून त्यातून बोध घेतल्यामुळेच आपल्याला समृद्ध भारताची उभारणी करणे आणि नव्या दमाने विकास घडविणे शक्य झाले आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी केले. ते शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग तथा सांस्कृतिक कार्य मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वंदे मातरम गीताच्या सार्थ शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
येथील महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व राणी कित्तूर चेन्नम्मा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सदरच्या कार्यक्रमाचे सोलापूर येथे आयोजन करण्यात आलेले होते.
यावेळी प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, NCC चे कमांडिंग ऑफिसर रणधिर सतिश, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार, कोषागार अधिकारी वैभव राऊत, एस,आर,पी,एफ सहाय्यक समादेश श्री.आऊंदेकर, सहायक पोलिस आयुक्त मच्छिंद्र पंडीत, तरूण भारतचे माजी संपादक अरविंद जोशी, प्रसाद जिरांकलगीकर,आय,टी,आय चे प्राचार्य मनोज बिडकर आदी कर्मचारी अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंदे मातरम गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी 358 तालुक्यातून या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. सोलापूर येथील कार्यक्रम होम मैदान येथे आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील हे होते. प्रसाद जिरांकलगीकर यांनी पाच कडव्यांचे संपूर्ण वंदे मातरम गीत सादर केले व त्यांच्या सुरात सूर मिसळून उपस्थित सुमारे साडेसहा हजार जणांनी हे गीत गाऊन वातावरण राष्ट्रभक्तीमय केले.
प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मनोज बिडकर यांनी प्रस्ताविक केले याप्रसंगी सोलापूर शहर व परिसरातील विविध 45 शाळा महाविद्यालय येथील प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी , विद्यार्थिनी यासोबतच शासकीय तथा निमशासकीय कार्यालय येथील कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील विविध शाळा तथा महाविद्यालयातील एनसीसी युनिट्स व एनएसएस युनिट्स चा या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग होता.
जुळे सोलापूर परिसरातील वि.मो. मेहता प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वंदे मातरम या विषयावर आकर्षक पथनाट्याचे सादरीकरण केले. याप्रसंगी विविध शाळा आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षणार्थींनी विविध राज्यांच्या पारंपारिक वेशभूषे सह उपस्थिती नोंदवून या सोहळ्यात रंगत आणली.
सोलापूर शहरातील हरीभाई देवकरण प्रशाला सिद्धेश्वर प्रशाला रॉजर्स इंग्लिश मीडियम स्कूल लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूल ज्ञान प्रबोधिनी प्रशाला सेवासदन प्रशाला वि मो मेहता प्रशाला हिराचंद नेमचंद प्रशाला विविध खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था यामधून शेकडो विद्यार्थी तसेच एस आर पी कॅम्प सोलापूर पोलीस ग्रामीण पोलीस पोलीस अधीक्षक कार्यालय यासारख्या विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी तथा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने सोलापूर येथे दि. 07 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत सामूहिक वंदे मातरम गायन उपक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात सोलापूरच्या जवळपास 45 माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांचे विद्यार्थी व शिक्षक, स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, सेवानिवृत्त कर्मचारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय, ग्रामीण पोलीस, जिल्हा कोषागार येथील प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयटीआयचे केंदळे प्रवीण व श्रीमती कुंभार यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य मनोज बिडकर यांनी केले, तर सूर्यकांत झणझणे यांनी आभार मानले.

0 Comments