पंढरपुरात रस्यावरच्या खड्ड्यात थेट लाकडी होड्याच सोडल्या! महर्षी वाल्मिकी संघाचे आणखी एक हटके आंदोलन
पंढरपूर (कटुसत्य वृत्त):-पंढरपूर शहरात असा एकही रस्ता राहिला नाही की जिथं खड्डे पडले नाहीत. विविध भागातील चौकाचौकात, विविध मार्गांवर सध्या प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिक व भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. याचाच निषेध म्हणून पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे वतीने काही दिवसांपूर्वी रस्त्यांवरील खड्ड्यात मेणबत्त्या लाऊन अनोखे आंदोलन केले होते, परंतु अद्यापही रस्त्यावरील खड्डे जैसे थे आहेत. त्यामुळे आज पुन्हा या संघटनेच्या वतीने रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यामधील साठवेल्या पाण्यात थेट लाकडी होड्याच सोडून आणखी एक हटके आंदोलन केले आहे.
यावेळी बोलताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव म्हणाले की, पंंढरपूर शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली परंतू प्रशासन याकडं लक्ष देत नसल्याने ऐन पावसाळ्यात भाविकांना व नागरिकांना याचा खुप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पंंढरपूर नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम खाते आदी प्रशासकीय यंत्रणेला जागे करण्यासाठी आज आम्ही अशा प्रकारे प्रतिकात्मक लाकडी होड्या सोडल्या आहेत.
आणखी काही दिवस जर खड्डे बुजवले नाहीत तर आमच्यावर ख-याखु-या आमच्या होड्या अशा प्रकारे रस्त्यावर आणाव्या लागतील.
जर तातडीने हा प्रश्न सोडला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.
रस्त्यावरचे खड्डे बुजवले च पाहिजे ! अशा जोरदार घोषणाही यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या.
0 Comments