माथाडी कायदा सरकारने मजबुत केला पाहिजे
जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे; बार्शी येथे हमाल तोलार कामगारांची बैठक संपन्न
बार्शी, (कटुसत्य वृत्त):-
माथाडी बोर्ड हे स्वायत: बोर्ड आहे, कामगारांच्या लेव्हीवर हे बोर्ड चालते. व्यापारी, आडती व शासनाचा यामध्ये पैसाही नाही. कामगारांच्या कष्टावर डॉ. बाबा आढाव यांनी संपूर्ण महाराष्ट्रात माथाडी बोर्डाची निर्मिती केली. हे बोर्ड अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. सरकारने ते अजून मजबुत केले पाहिजे, त्याचे पंख छाटता कामा नये असे हमाल मापाडी महामंडळाचे राज्याचे सहचिटणीस तथा सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी सरकारला ठणकावून सांगितले. ते बार्शी येथील हमाल तोलार बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष तथा बार्शीचे अध्यक्ष गोरख जगताप, कुर्डूवाडी हमाल पंचायतचे लक्ष्मण तात्या बागल, पंढरपूर हमाल पंचायतचे उपाध्यक्ष गजानन भुईटे, पत्रकार हर्षल बागल, श्रीनिवास शिंदे, माजी जिल्हा उपाध्यक्ष ताजुद्दीन शेख, कृषी उत्पन्न बाजार बाजार बार्शीचे कामगार प्रतिनिधी चंद्रकांत मांजरे यांच्यासह बार्शी व वैराग येथील हमाल तोलार कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना शिवाजीराव शिंदे म्हणाले की, डॉ. बाबा आढाव यांनी वयाच्या ९६ वर्षी माथाडी कायदा वाचावा त्याचे पंख छाटले जाऊ नये म्हणून पुणे आयुक्त कार्यालयासमोर १६ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर पर्यंत आंदोलनाचा एल्गार फुकारला होता. या आंदोलनामध्ये पुणे विभागातून पाच जिल्ह्यांनी सहभाग नोंदविला होता. पण कामगार मंत्र्यांच्या मध्यस्थीने व त्यांच्या फोनवरूनच डॉ. बाबा आढाव यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्र्यांसमवेत बैठक घेऊन यावर मार्ग काढू असे आश्वासन दिल्यानंतर डॉ. बाबा आढाव यांनी त्या आंदोलनास तात्पुरती स्थगिती दिली, पण प्रत्येक जिल्हा पातळीवर त्या त्या ठिकाणच्या पदाधिकारी यांनी हमाल व तोलारांच्या बैठका घेऊन माथाडी बोर्डाची जागृती केली पाहिजे, त्यासाठी ठिकठिकाणी बैठकी घेण्यात याव्यात असे सांगितल्यानंतर त्याचाच भाग म्हणून जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बार्शी येथील हमाल भवनमध्ये हमाल तोलार कामगारांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याबैठकीमध्ये शिवाजी शिंदे यांनी माथाडी बोर्डाविषयी संपूर्ण माहिती देऊन कामगार बांधवांनी आपला पगार माथाडी बोर्डातच भरला पाहिजे व माथाडी बोर्डातूनच पगार घेतला पाहिजे, कोणत्याही कामगारांनी रोख पगार घेतला नाही पाहिजे, व्यापारी, आडती, ठेकेदार यांनी सर्व हमाल तोलारांचा पगार माथाडी बोर्डात भरण्यासाठी त्यांना माथाडी बोर्डाकडून लगादा लावला पाहिजे असे सांगितले.
यावेळी बार्शी व वैराग येथील हमाल तोलार कामगारांचे पदाधिकारी, हमाल तोलार कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments