Hot Posts

6/recent/ticker-posts

साेलापूर जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी जीवन संपवले'; सोयाबीन पाण्याखाली

 साेलापूर जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी जीवन संपवले'; सोयाबीन पाण्याखाली




पांगरी (कटूसत्य वृत्त):-अतिवृष्टीमुळे शेतातील काढणीला आलेल्या सोयाबीन व अन्य पिकांचे नुकसान झाले. 'डोक्यावरील बॅंकेचे कर्ज कसे फेडू, मुलांचे शिक्षण कसे करू' या विवंचनेतून बार्शी तालुक्यातील कारी व दहिटणे या गावातील शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.  शरद भागवत गंभीर (वय ३९, रा. कारी) व लक्ष्मण काशीनाथ गावसाने (वय ४२, रा. दहिटणे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
कारी येथील गजानन गंभीर यांनी पांगरी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोन-तीन दिवसापासून तो नैराश्यात होता. त्यामुळेच शरदने बुधवारी (ता. २४) शेतात घराजवळ असलेल्या शेलवटीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पांगरी पोलिसांत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. दुसरीकडे दहिटणे येथील लक्ष्मण गावसाने वैरागला बाजारला जातो, असे सांगून मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. दुपारनंतरही ते घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने दिर सागर गावसाने यांना पतीचा फोन लागत नसल्याचे सांगितले.   त्यानंतर सागर यांनी भावाचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. त्यानंतर त्यांनी भाऊ हरवला असून कोणाला आढळल्यास सांगावे, असे मोबाईलवर स्टेटस ठेवले होते. दरम्यान, सासुरे येथील सज्जन करंडे यांनी सागर गावसाने यांना बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास फोन केला. यादव यांच्या शेतातील झाडाला एकाने गळफास घेतला आहे, तो तुमचाच भाऊ आहे का? याची खात्री करा, असे त्यांनी सांगितले. त्यासंदर्भात खात्री केली असता तो लक्ष्मण हेच असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी वैराग पोलिसांत धाव घेतली. पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

मुलगी फार्मसी तर मुलगा इंजिनिअरिंगला, पण...

लक्ष्मण गावसाने यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेल्याने एक रूपयाही हाती आला नाही. त्यांची मुलगी 'बी फार्मसी'चे शिक्षण घेत आहे. तर मुलगा धाराशिव येथे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. दरम्यान, मयत लक्ष्मण यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून त्यात त्यांनी 'अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने आत्महत्या करीत आहे, माझ्या मुलांकडे लक्ष द्यावे, मला मदत करा' असे चिठ्ठीत नमूद असल्याचे वैराग पोलिसांनी सांगितले. उद्या (गुरूवारी) यासंदर्भात तपास होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.


चौकट

चिठ्ठीतील मजकुराने पाणावले डोळे

३९ वर्षीय शरद गंभीर या तरुण शेतकऱ्याला एक मुलगा-एक मुलगी आहे. कुटुंबासाठी तो आधार होता. सततच्या पावसामुळे त्याच्या पिकात पाणी साचल्याने पीक काढताच आले नाही. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहली होती. त्यात 'सारखा पडत आहे, पावसामुळे माझ्या शेतात पाणी साचले आहे, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, आता माझ्यावर असलेले कर्ज कसे फेडू, मुलांच्या शिक्षणाचे कसे होईल, मला माफ करा, माझ्या मुलांची काळजी घ्या', असे भावनिक मजकूर त्या चिठ्ठीत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments