ओल्या दुष्काळात महाराष्ट्राला केंद्राची मदत नाहीच? मुख्यमंत्री हतबल, रोहित पवारांची २० हजार कोटींच्या मदतीची मागणी
मुंबई (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रातील सोलापूर, मराठवाडा, विदर्भ, कोकण तसेच इतर भागांत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन केंद्राकडून आर्थिक मदतीची मागणी केली होती. मात्र, या भेटीतून कोणतीही ठोस मदत जाहीर झालेली नाही.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना दिलेल्या प्रतिक्रियेतून त्यांच्या हतबलतेचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळालेली केवळ आश्वासने तीही कोरडी अशीच असल्याचे संकेत या प्रतिक्रियेतून मिळाले.
देशाच्या तिजोरीत सर्वाधिक वाटा उचलणारा महाराष्ट्र आज अडचणीत असताना केंद्राकडून मदतीऐवजी केवळ आश्वासनेच मिळत असतील, तर दिल्लीतील महाराष्ट्राचे राजकीय वजन कमी झाले आहे का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.रोहित पवार पत्रकार परिषदेत बोलताना केंद्र व राज्य सरकारने मिळून मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी किमान २०,००० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी केली. यासोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
पूर, अवकाळी पाऊस आणि सतत बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. आता केवळ पंचनाम्यांवर आणि आश्वासनांवर वेळ घालवण्यापेक्षा तात्काळ मदतीची गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन २० हजार कोटींची मदत आणि कर्जमाफीची घोषणा करावी, असे रोहित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
या पार्श्वभूमीवर आता राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने कोणता ठोस निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments