पूर्ण क्षमतेने कारखान्याला ऊस द्यावा - जयसिंह मोहिते-पाटील
अकलूज (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षी साखर कारखाना आता कर्जमुक्त झालेला आहे. त्यामुळे आपण यावेळी जिल्ह्यात सर्वाधिक दर देणार आहे. सभासदांनी पूर्ण क्षमतेने या कारखान्याला आपला ऊस द्यावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले आहे.
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याची ६५ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली. सभेपुढे मांडण्यात आलेल्या सर्व १३ विषयांना सभासदांनी एकमुखाने मंजुरी दिली.
यावेळी मोहिते-पाटील म्हणाले, शासन उसाच्या उपलब्धतेचा अभ्यास न करता नव्या कारखान्यांना उभारणीसाठी तर जुन्या कारखान्यांना विस्तारवाढीसाठी परवानगी देत आहे. त्यामुळे गळीत हंगामाच्या काळात दराची स्पर्धा सुरू होऊन ऊस पळवापळवी होऊ लागली आहे.
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले, सरकारने २०१९ मध्ये साखरेचा ३१०० रुपये दर ठरवून दिला होता. तो अद्यापही तसाच आहे. तो दर वाढवून ४१०० रुपये करावा. इथेनॉलच्या दरात ६ ते ७ रुपयांनी वाढ करावी, अशी मागणी आता सगळ्यांकडून होत आहे.
यावेळी गत हंगामात उसाचे दर्जेदार उत्पादन घेतलेल्या सभासद शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कामगारांना १० टक्के बोनस जाहीर करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, कार्यकारी संचालक राजेंद्र चौघुले, सर्व आजी माजी संचालक, कामगार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे माळशिरस तालुक्यातील शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, असा ठरावही यावेळी करण्यात आला.
0 Comments