खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रयत्नाने विशेष रेल्वे सेवा सुरू
अकलूज (कटूसत्य वृत्त):- माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशिल मोहिते–पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, कोल्हापूर–कलबुर्गी–कोल्हापूर (गाडी क्र. 01451 व 01452) ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा शुभारंभ (फ्लॅग ऑफ) सांगोला रेल्वे स्थानक येथे खासदार यांच्या सौभाग्यवती सौ. शितलदेवी धैर्यशिल मोहिते–पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रसंगी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सौभाग्यवती सौ. डॉ. निकिताताई देशमुख उपस्थित होत्या. यावेळी फ्लॅग ऑफ समारंभ, रेल्वे इंजिन पूजन व चालकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, सांगोला शहर व तालुक्यातील नागरिक, शहीद अशोक कामटे संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रेल्वे सेवेमुळे सांगोला तालुक्यासह परिसरातील नागरिकांना कोल्हापूर व कलबुर्गी या दोन्ही दिशांना प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
0 Comments