घरात चिखल, शेतात उध्वस्त पिकं; पूरबाधितांचा संसार उभा करण्यासाठी धडपड
सोलापूरात पूर ओसरला; मदतकार्यास वेग, पण पुन्हा जोरदार पावसाची शक्यता
सोलापूर(कटुसत्य वृत्त):- (सचिन जाधव):- सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आलेल्या महापुराचे पाणी आता हळूहळू ओसरू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळलेल्या अविरत पावसानंतर शुक्रवारी काही ठिकाणी ऊन दिसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, नुकसानीचे विदारक चित्र उघड होत असून संसार उभा करण्यासाठी नागरिकांना पुन्हा कष्ट करावे लागत आहेत.
करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूरसह अनेक तालुक्यांमध्ये सीना व भीमा नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो कुटुंबांचे घरदार उद्ध्वस्त झाले. घरात चिखल, पाण्यात कुजलेले साहित्य, फर्निचर व अन्नधान्य नष्ट झाल्याने बाधितांची स्थिती दयनीय झाली आहे. अनेकांनी डोळ्यांतील पाणी पुसत, उरलेले थोडेफार सामान वाचवण्याची धडपड सुरू केली आहे.
शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक आघात
या पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. काळ्या मातीतील खरीप हंगामाचा उद्ध्वस्त झालेला पिकांचा पट्टा पाहून शेतकऱ्यांचे हृदय पिळवटून निघाले आहे. पै-पै साठवून संसार उभा करणाऱ्या ग्रामीण भागातील कुटुंबांचे अस्तित्वच डळमळीत झाले आहे. "निसर्गापुढे काही चालत नाही" असे हतबलपणे सांगत शेतकरी प्रशासनाकडे तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
पूरामुळे ठप्प झालेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सोलापूर-पुणे महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू झाली असून रेल्वेसेवाही पूर्ववत सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र, सोलापूर-विजयपूर महामार्ग अद्याप बंद आहे.
प्रशासन व संस्थांचा मदतीसाठी धाव
एनडीआरएफच्या पथकांसह लष्कराने बचाव व मदतकार्याला गती दिली आहे. आतापर्यंत १२९ गावे पाण्याने वेढली असून हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. विविध सामाजिक संस्था, संघटना आणि कार्यकर्ते बाधितांना अन्न, पाणी व आवश्यक साहित्य पुरवण्यासाठी पुढे सरसावले आहेत. दरम्यान, मंत्री व विरोधी पक्षनेते यांनी दौरे करून नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
पुन्हा रेड अलर्टची भीती
मात्र दिलासा देणाऱ्या या घडामोडींमध्येही पुन्हा संकटाची चाहूल आहे. हवामान खात्याने शनिवारी व रविवारी सोलापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. शुक्रवारी सकाळपासूनच पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी ओढे, नाले व तलाव तुडुंब भरून वाहत आहेत.
पूर ओसरल्याने जनजीवन पूर्ववत होण्यास सुरुवात झाली असली तरी विदारक नुकसानीमुळे बाधितांना सावरायला वेळ लागणार आहे. पुढील दोन दिवसांचा पावसाचा अंदाज लक्षात घेता प्रशासन व नागरिकांची चिंता वाढली आहे. सरकारकडून मदतीची अपेक्षा वाढली असून, बळीराजावर आलेल्या या संकटात ठोस उपाययोजना आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
0 Comments