Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यातील 22 जिल्ह्यांना 'रेड अलर्ट'

 राज्यातील 22 जिल्ह्यांना 'रेड अलर्ट'




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर पुन्हा शनिवार व रविवारी हवामान खात्याने सोलापूर, पुणे व धाराशिवसह २२ जिल्ह्यांना 'रेड अलर्ट' दिला आहे. सीना नदीस आलेल्या पुराने धास्तावलेल्या नागरिकांना या रेड अलर्टने पुन्हा धडकी भरली आहे.

पुरामुळे नदीकाठावरील व गावात पाणी शिरल्याने आठ हजाराहून अधिक नागरिकांना निवारा केंद्रात स्थलांतर करावे लागले आहे. यामुळे पुढील दोन दिवसांत मोठा पाऊस झाल्यास आणखी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने २७ व २८ सप्टेंबर हे दोन दिवस रेड अलर्ट दिलेला असून, सोलापूर जिल्ह्यात शनिवारी दुपारी दोनपासून ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत रेड अलर्ट दिला आहे. शेजारील पुणे जिल्ह्यात शनिवारी दुपारी २ ते रात्री ८ तर रविवारी पूर्ण दिवस रेड अलर्ट जारी केला आहे.

असा आहे इशारा...

शनिवार, २७ सप्टेंबर

सकाळी ८ ते दुपारी २ : नांदेड व लातूर

दुपारी २ ते रात्री ८ : सोलापूर, पुणे, धाराशिव व लातूर

रात्री ८ ते मध्यरात्री १२ : सोलापूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर

रविवार, २८ सप्टेंबर

मध्यरात्री १२ ते सकाळी ६ : सोलापूर, पुणे, सातारा, बीड, अहिल्यानगर

सकाळी ६ ते दुपारी १२ : पुणे, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर

दुपारी १२ ते सायंकाळी ६ : पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर

नांदेड, बीड, धाराशिवमध्ये पाऊस

नांदेड - मराठवाड्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही भागात अजूनही पूरस्थिती कायम आहे. दरम्यान, दोन-तीन दिवसांच्या खंडानंतर काही भागांत शुक्रवारी पाऊस झाला. नांदेड शहरात सकाळपासून रिमझिम सुरू असलेल्या पावसाने सायंकाळी काही काळासाठी जोर धरला. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले.

विष्णुपुरी धरणाऱ्या १६ दरवाजांतून एक लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर कायम आहे. नदीकाठच्या काही भागांना या पुराचा वेढा आहे. जिल्ह्यात शनिवारी (ता. २७) पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर झाला आहे. प्रशासन पावसाच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहे.

धाराशीव जिल्ह्याच्या काही भागांमध्ये गुरुवारी रात्री तर आज पहाटे अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दिवटी) महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. या मंडळात १३७.५ मिलिमीटर पाऊस झाला.

Reactions

Post a Comment

0 Comments