Hot Posts

6/recent/ticker-posts

अवकाळी पाऊसामुळे बेगमपुर भागातील हजारो एकर द्राक्षबागांना मोठा फटका

अवकाळी पाऊसामुळे बेगमपुर भागातील हजारो एकर द्राक्षबागांना मोठा फटका


बेगमपुर (कटूसत्य वृत्त):- मध्यरात्रीपासून मोहोळ तालुक्‍यात बेगमपुर व परिसरात अवकाळी पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसाचा द्राक्ष, डाळिंब बागांसह रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे.अवकाळीमुळे बेगमपुर व परिसरात सुमारे हजारो एकरावरील द्राक्षबागा धोक्‍यात आल्या आहेत. तर डाळिंब बागांचेही मोठे नुकसान झाले आहे.सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे पार कंबरडे मोडले आहे. सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी केली जात आहे.

सततच्या हवामान बदलामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी, सीताफळ,पेरू यासह अन्य फळबागा व भाजीपाल्याची शेती धोक्‍यात आली आहे. यावरही मात करत द्राक्ष बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अशातच अवकाळी पावसाची संततधार सुरू आहे. रविवार पहाटेपासून पावसाचा आणखी जोर वाढला आहे. सलग आठ तासाहून अधिक काळ पाऊस सुरू असल्याने द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

संततधार पावसामुळे द्राक्ष घडात पाणी शिरल्याने कुजवा आणि दावण्याचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.तर अनेक ठिकाणी द्राक्ष गळून पडत आहेत.त्यामुळे उत्पादनात मोठी घट होईल, अशी शक्‍यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. अवकाळीचा सर्वाधिक फटका बेगमपुर, अर्धनारी, वडदेगाव,इंचगाव, सोहाले,वाघोली, येनकी,कामती,या भागातील द्राक्षबागांना बसला आहे. मिरची,कांदा,शेवगा यासह इतर भाजीपाल्यांच्या शेतीलाही अवकाळीचा मोठा फटका बसला आहे, कालपासून काही भागात पाऊस सुरू झाल्याने  अवकाळी पावसामुळे द्राक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. आधीच द्राक्ष शेती संकटात आहे.अशातच अवकाळी

पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. बेगमपुर व परिसरात हजारो एकर द्राक्ष बागेचे अवकाळीमुळे सुमारे  कोटय़वधीं रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी 

द्राक्ष उत्पादक शेतकरी जलिंदर डोके,विशाल शिनगारे, राहुल डोके,सचिन पाटील व परिसरातील शेतकरी

करत आहेत.तर आजच्या अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका द्राक्षबागांना बसला आहे. कुजव्या, करपा, डावण्या, घड जिरणे, आदी संभाव्य रोगांपासून बागा वाचविताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यातूनच फवारण्यांचा खर्च वाढणार आहे. शेतात पाणी साठून राहिल्याने सर्वच पिकांच्या पांढरी मुळीची वाढ खुंटणार आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. 


 महाराष्ट्र सरकारने आदेश काढून सरकारी अधिकाऱ्याने बांधावर येऊन त्वरित पंचनामे करावे,अशी मागणी या बेगमपुर व परिसरातील शेतकरी करत आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments