हलदहिवाडी येथील पारसे कुटुंबियांना आपुलकी प्रतिष्ठानचा आधार !
सांगोला (प्रतिनिधी)- सांगोला तालुक्यातील हलदहिवडी येथील अण्णासो विठ्ठल पारसे व विठ्ठल नाथा पारसे यांच्या घरावर वीज पडून लागलेल्या आगीत उपजीविकेसाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य जळून खाक झाल्यामुळे पारसे कुटुंबीयांना आपुलकी प्रतिष्ठान सांगोला यांच्या वतीने गहू, ज्वारी, तांदूळ व दाळी देवून आपुलकीचा आधार देण्यात आला. बुधवारी सायंकाळी सांगोला तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसावेळी हलदहिवडी येथील विठ्ठल नाथा पारसे व अण्णा विठ्ठल पारसे यांच्या घरावर वीज पडल्यामुळे पारसे कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले. पारसे कुटुंबीय जवळच असलेल्या पत्रा शेडमध्ये थांबल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र त्यांच्या घरातील प्रपंचाला लागणारे सर्व साहित्य या आगीत जळून खाक झाले. पारसे कुटुंबीय उघड्यावर आल्यामुळे त्यांना दैनंदिन गरजा भागवणेही अवघड झाले आहे. याची दखल घेत सांगोला येथे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आपुलकी प्रतिष्ठानच्यावतीने अण्णासो पारसे व विठ्ठल पारसे यांना ५० कि. गहू, ५० कि. ज्वारी, ३० कि. तांदूळ व ११ किलो विविध दाळी देऊन आपुलकी प्रतिष्ठान कडुन आधार देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी न करता पारसे कुटुंबीयांकडे ही मदत शुक्रवारी सायंकाळी सुपूर्द करण्यात आली.

0 Comments