ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात दुमदुमले एमआयटी विश्वशांती गुरुकुल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका रुपाली हजारे आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य राजकुमार गायकवाड यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी विठ्ठल -रुक्मिणी व वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत टाळ-मृदंगाचा गजर करत, अभंग-भजन म्हणत आणि 'ज्ञानोबा-तुकारामा'च्या जयघोषात काढलेल्या दिंडीने संपूर्ण विद्यालय परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक लोकखेळ सादर करत समृद्ध सांस्कृतिक वारशाचे सुंदर दर्शन घडविले. विद्यार्थ्यांनी संत तुकाराम, संत मीराबाई, संत चोखामेळा, संत नरहरी सोनार आणि संत सावता माळी यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी कथा सादर केल्या. या सादरीकरणातून संतांची भक्ती, त्यांची समता व मानवतेची शिकवण आणि समाजप्रबोधनाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
यानंतर 'विठ्ठल भक्ती आणि आजची युवा पिढी' आणि 'आधुनिक जगात तणाव कमी करण्यासाठी आध्यात्मिक जीवनशैली कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकते' आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी निबंध लेखन करून अध्यात्म, संस्कार आणि आधुनिक जीवनशैलीमध्ये मूल्यांचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.
यावेळी बोलताना मुख्याध्यापिका रुपाली हजारे म्हणाल्या, "विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची ओळख करून देणे, संतपरंपरेचे विचार त्यांच्या मनात रुजविणे आणि संस्कारक्षम पिढी घडविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे." ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य राजकुमार गायकवाड यांनी "शालेय जीवनात संस्कार आणि अध्यात्माची जोड मिळाल्यास विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते," असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
.png)
No comments:
Post a Comment