पीसीयू म्हणजे दूरदृष्टी व जागतिक उद्दिष्टे असलेले शिक्षण केंद्र – डॉ. विजय भटकर
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पीसीयू सज्ज - हर्षवर्धन पाटील
पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न
पिंपरी पुणे (दि. ०४ जानेवारी २०२६) पीसीयू म्हणजे दूरदृष्टी व जागतिक उद्दिष्टे असलेले २१ व्या शतकातील अत्याधुनिक शिक्षण केंद्र आहे, जागतिक दर्जाचे विद्यापीठ म्हणून ही संस्था वेगाने पुढे जात आहे असे गौरवोद्गार परम महासंगणकाचे शिल्पकार डॉ. विजय भटकर यांनी पीसीयूच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्यात काढले.
विद्यापीठाच्या ध्येयधोरणाचे आणि दीर्घकालीन शैक्षणिक दृष्टीचे भटकर यांनी विशेष कौतुक केले. शैक्षणिक विस्ताराच्या योजना तसेच प्रस्तावित केंद्रीय संशोधन सुविधा, संशोधन केंद्र या उपक्रमांचा उल्लेख करत, हे केंद्र विद्यार्थी, प्राध्यापक आणि उद्योग क्षेत्रासाठी आंतरशाखीय संशोधन, नवोन्मेष आणि व्यावहारिक समस्यांच्या निराकरणासाठी एक महत्त्वाचे सामायिक व्यासपीठ ठरेल, असा विश्वास डॉ. भटकर यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ, पुणे येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ शनिवारी (दि.३) विद्यापीठ कॅम्पसमध्ये संपन्न झाला.
पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील म्हणाले, जागतिक दर्जाचे उद्योग - संलग्न विद्यापीठ म्हणून विकसित होण्याचे पीसीयूचे उद्दिष्ट आहे. वेगाने विकसित होणाऱ्या आधुनिक उद्योग व्यवसायासाठी ज्ञान आणि संशोधन वृत्ती असणारे कुशल मनुष्यबळ घडविण्याने काम पीसीयू मधील उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग करीत आहे. शैक्षणिक संस्था आणि उद्योग या दोन्ही घटकांनी एकत्र पद्धतीने काम केल्यास आर्थिक आणि सामाजिक आव्हानांवर उपाय शोधण्यास मदत होईल. आता आम्ही केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार देशाच्या विकासात सहभागी होण्यास पूर्ण क्षमतेने सज्ज आहोत असे पाटील यांनी सांगितले.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले सचिव विठ्ठल काळभोर खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, एसटीपी पुणेचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, पीसीयू व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. पंडित भालचंद्र विद्यासागर, सचिन इटकर, डॉ. दिनेश अमळनेरकर, राजेश पाटील, सलीम शिकलगार, पदवी प्राप्त विद्यार्थी, पालक, प्राध्यापक वर्ग आदी उपस्थित होते.
यावेळी निषाद देशमुख, प्रेरणा लक्ष्मण कदम, अस्मिता सर्जेराव पाटील, मयुरी रोहिदास गव्हाणे, संजय हिमदेवी ठाकरे या सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांसह सर्व पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
डॉ. नितीन करमाळकर म्हणाले की, पीसीयूची शैक्षणिक रचना राष्ट्रीय शिक्षण धोरण च्या सुसंगत असून सर्वांगीण शिक्षण, बहुविषयक अभ्यास आणि लवचिकता यांना प्रोत्साहन देते. यामुळे पदवीधर विद्यार्थ्यांना बदलत्या व्यावसायिक जगासाठी सक्षम बनविण्यात पीसीयू यशस्वी ठरत आहे.
डॉ. राजेंद्र जगदाळे म्हणाले की, उद्योग क्षेत्राचा दृष्टिकोन मांडत विद्यापीठाने केवळ नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे उद्योजक घडविण्याच्या दिशेनेही पावले उचलावीत. या विद्यापीठातून एक सक्षम उद्योजकीय परिसंस्था विकसित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी पीसीयूचा अहवाल सादर करताना सांगितले की, अल्पकालावधीत झालेल्या प्रगतीचा आढावा घेत शैक्षणिक उत्कृष्टतेप्रती असलेली विद्यापीठाची बांधिलकी स्पष्ट केली. आमचे उद्दिष्ट केवळ पदवीधर निर्माण करणे नसून, नैतिक मूल्यांवर आधारित, बौद्धिकदृष्ट्या सक्षम, सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि उद्योग पूरक व्यक्तिमत्त्व घडविणे हे आहे.
स्वागत डॉ. विधी वैरागडे, सूत्रसंचालन पूजा डोळस आणि आभार डॉ. रेणू पराशर यांनी मानले.
.jpg)
.jpg)
0 Comments