Hot Posts

6/recent/ticker-posts

अवैध मुरूम तस्करांचा महिला वन अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

 अवैध मुरूम तस्करांचा महिला वन अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

 खरातवाडी वनपरिक्षेत्रातील घटना,  प्रसंगावधानामुळे अधिकारी सुखरूप, आरोपींवर गुन्हा दाखल

पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर वनपरिक्षेत्रातील मौजे खरातवाडी (गट नं. 280) येथे दि. 6 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास शासकीय कर्तव्य बजावत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) श्रीमती शितल बालाजी चाटे यांच्यावर मुरूम माफियांकडून अंगावर टिपर घालून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. चाटे यांनी वेळेत बाजुला उडी मारल्याने त्या बचावल्या आहेत. करकंब पोलीस ठाण्यात या प्रकरणी चार आरोपीवर भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती शितल चाटे, वनपाल बापूराव शंकरराव भोई हे गस्तीवर होते. तेव्हा त्यांना खरातवाडी वनक्षेत्रातून 3 टिपर अवैध गौण खनिज (मुरूम) भरून जाताना आढळले. यातील एका टिपरचा क्रमांक (एमएच-16-एवाय 6816) होता. तर दोन टिपर विना-नंबर प्लेट होते. श्रीमती चाटे यांनी सदर वाहने थांबवून, “मी वनपरिक्षेत्र अधिकारी आहे“ असे स्पष्ट सांगून वाहनचालकास स्वतःचा परिचय करून दिला. तसेच वाहन चालकांकडे परवान्याची मागणी केली. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या वाहनांमध्ये अवैध मुरूम असल्याचे निष्पन्न झाल्याने, ती जप्त करून वन कार्यालयात नेण्याचे आदेश देण्यात आले. वाहने जप्त करून नेत असताना, आरोपी सिद्धार्थ चंद्रकांत नाईकनवरे (रा. व्होळे ता. पंढरपूर) याने बनाव करून टिपर थांबवला. अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता, त्याने “वनविभाग तुमच्या बापाचा नाही“ अशा अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्याचवेळी, तोंडाला रुमाल बांधलेला एक अनोळखी इसम तिथे आला. श्रीमती चाटे यांनी त्यालाही आपली ओळख पत्र दाखवून परिचय दिला. तरीही त्याने वाद घालत श्रीमती चाटे यांचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला. तर अनोळखी इसमाने गाडी चालू केली. श्रीमती चाटे यांनी गाडी न हलवण्याबाबत कायदेशीर समज दिली. तरी देखील आरोपीने “तुम्ही बाजूला व्हा, नाहीतर मी टिपर तुमच्या अंगावर घालीन“ अशी उघड धमकी दिली. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याने मुरूमाने भरलेला भरधाव टिपर श्रीमती चाटे यांच्या अंगावर घातला. यावेळी श्रीमती चाटे यांनी प्रसंगावधान राखून बाजूला उडी घेतल्याने त्या या भीषण हल््यातून थोडक्यात बचावल्या. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र आरोपींनी शासकीय जप्तीतील वाहने घेऊन पळ काढला.


चौकट
यांच्यावर कारवाई-

या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती शितल चाटे यांच्या फिर्यादीवरून करकंब पोलीस ठाण्यात  सिद्धार्थ चंद्रकांत नाईकनवरे (रा. व्होळे, ता. पंढरपूर), चंद्रकांत बाळासाहेब घोडके (रा. व्होळे, ता. पंढरपूर) आणि दोन अनोळखी इसम यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक  निलेश गायकवाड हे करीत आहेत.

कोट-
या प्रकरणी वनविभागामार्फत वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे.वन अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना अशा हल््यांना भीक घालणार नाहीत. अवैध व्यवसायांवर कडक कारवाई सुरूच राहील, असा संदेश वन विभागाने दिला आहे.
        
Reactions

Post a Comment

0 Comments