Hot Posts

6/recent/ticker-posts

४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

 ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा 




महाराष्ट्राला मुलींच्या गटात सुवर्ण तर मुलांना रौप्य 
मुलांच्या गटात यजमान कर्नाटकला सुवर्ण तर मुलींच्या गटात ओडिशाला रौप्य  
बेंगळुरूच्या मातीत खो-खोचा थरार; अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्राच्या रणरागिणींनी ओडिशाला धूळ चारली, तर मुलांच्या अंतिम सामन्यात कर्नाटकचा विजय
महाराष्ट्राच्या मुलींचे सलग ११ वे अजिंक्यपद तर एकूण २७ वे अजिंक्यपद.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी सोलापूरच्या स्नेहा लामकानेला ‘जानकी’ पुरस्कार तर कर्नाटकच्या बी. विजयला 'वीर अभिमन्यू’ पुरस्कार 

बेंगळुरू (कटूसत्य वृत्त):- (क्री. प्र.) :  बेंगळुरूच्या 'गुंजूर' मैदानावर पार पडलेल्या ४४ व्या कुमार-मुली (ज्युनिअर) नॅशनल खो-खो चॅम्पियनशिप २०२५-२६ मध्ये खेळाचा अंगावर शहारे आणणारा थरार पाहायला मिळाला! खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या  मान्यतेने आणि कर्नाटक खो-खो असोसिएशनद्वारे आयोजित या स्पर्धेत मध्ये वेग, चपळता, डावपेच आणि जिद्दीचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला. अटीतटीच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या रणरागिणींनी आपल्या कौशल्याच्या जोरावर ओडिशाला नमवून सुवर्णपदक पटकावत अजिंक्यदावर नाव कोरले, तर मुलांच्या अंतिम सामन्यात यजमान कर्नाटकने बलाढ्य महाराष्ट्रावर मात करत सुवर्णावर कब्जा केला. या विजयाने दोन्ही राज्यांच्या खेळाडूंनी भारतीय खो-खो क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
महाराष्ट्राची सुवर्णपरंपरा कायम, इतिहासाला नवी झळाळी
महाराष्ट्राने गेल्या वर्षापर्यंत सलग १० दुहेरी अजिंक्यपदे मिळवली होती. मुलांच्या गटात सलग १९ आणि एकूण ३५ अजिंक्यपदे महाराष्ट्राच्या नावावर होती; मात्र यंदा ही परंपरा खंडित झाली. तरीही महाराष्ट्राच्या मुलींनी सलग ११ वे व एकूण २७ वे अजिंक्यपद जिंकत आपली वर्चस्वाची गाथा अधिक भक्कम केली. या स्पर्धेत सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील स्नेहा लामकाने हिने ‘जानकी पुरस्कार’ पटकावत स्वतःसह महाराष्ट्राचे नाव उज्वल केले, तर कर्नाटकच्या बी. विजय याला ‘वीर अभिमन्यू पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
मुलींचा अंतिम सामना: महाराष्ट्राची विजयाची गुढी
मुलींच्या गटात महाराष्ट्र आणि ओडिशा यांच्यात झालेला सामना अत्यंत थरारक ठरला. मध्यंतरापर्यंत १४-११ अशा निसटत्या फरकाने महाराष्ट्र आघाडीवर होता. तर संपूर्ण वेळेत दोन्ही संघांचा गुणफलक २५-२५ असा बरोबरीत होता. त्यानंतर झालेल्या अतिरिक्त डावात महाराष्ट्राने दमदार खेळ करत ४४-३३ असा ११ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्राच्या रणरागिणींनी जशी आपली कामगिरी पार पडली तशी अंतिम सामन्यात सुध्दा धमाकेदार ठेवत अजिंक्यपदावर नाव कोरले. या विजयात महाराष्ट्राच्या स्नेहा लामकाने (३, २.४० मि. संरक्षण व ४ गुण), मैथिली पवार (१.३०, १.३० मि. संरक्षण व ६ गुण), सानिका चाफे (२.२०, १.४० मि. संरक्षण व २ गुण), दीक्षा काटेकर (१.२० मि. संरक्षण व १० गुण), श्रावणी तामखडे (२, १.४०, १.१० मि. संरक्षण), श्रुती चोरमरे (१२ गुण) व श्वेता नवले (नाबाद २ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी विजयी गुढी उभारताना प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवले. तर पराभूत ओडिशाच्या खेळाडूंनी दिलेली लढत वाखाणण्याजोगी होती. त्यांच्या अर्चना प्रधान (२.५० मि., २.३० मि., १.१० मि. संरक्षण व ८ गुण), तृप्ती बारीक (२.२० मि., १.१० मि., १.०० मि. संरक्षण व ४ गुण), चिन्मयी प्रधान (६ गुण) आणि के. रम्या (२.०० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी उत्कृष्ट खेळ केला. ओडिशाच्या मुलींची झुंजार लढत दिली मात्र शेवटी त्यांच्या पदरी निराशाच आली. या विजयानंतर महाराष्ट्राच्या खेळाडू व प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. 
मुलांचा थरार: कर्नाटकचा घरच्या मैदानावर विजय
मुलांच्या अंतिम सामन्यात यजमान कर्नाटकने महाराष्ट्रावर ३५-३० अशी ५ गुणांनी मात केली. मध्यंतराला कर्नाटकने २३-१२ अशी मोठी आघाडी घेतली होती. कर्नाटककडून विजय बी. (१.४८, १.१० मि. संरक्षण व ८ गुण), इब्राहिम (२.१० मि. संरक्षण व ४ गुण), जीवन राठोड (१.५० मि. संरक्षण व २ गुण), जीवन के. (२.१० मि. संरक्षण) आणि अनिकेत (६ गुण) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. महाराष्ट्राच्या मुलांना जरी अपयश आले तरी त्यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद ठरली. उपविजेत्या ठरलेल्या महाराष्ट्र संघाकडून राज जाधव (१.२० मि. संरक्षण व ८ गुण), हरदया वसावे (१.३० मि. संरक्षण व २ गुण), पार्थ देवकाते (१ मि. संरक्षण व ४ गुण), जितेंद्र वसावे (१ मि. संरक्षण व ४ गुण) आणि योगेश पवार (१.५० मि. संरक्षण) यांनी झुंजार खेळ केला, मात्र संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
वैयक्तिक पुरस्कारांचे मानकरी ठरले चमकते तारे
स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. मुलींच्या गटात महाराष्ट्राची स्नेहा लामकाने 'जानकी पुरस्कारा'ची मानकरी ठरली, तर दीक्षा काटेकर (महाराष्ट्र) हिने 'सर्वोत्कृष्ट आक्रमक' आणि ओडिशाच्या अर्चना प्रधान हिने 'सर्वोत्कृष्ट संरक्षक' पुरस्कार पटकावला. मुलांच्या गटात कर्नाटकच्या विजय बी. याला 'वीर अभिमन्यू पुरस्कार' मिळाला. महाराष्ट्राचा राज जाधव 'सर्वोत्कृष्ट आक्रमक' आणि कर्नाटकचा प्रज्वल वाय. 'सर्वोत्कृष्ट संरक्षक' ठरला.
प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव (प्र. कार्यवाह महाराष्ट्र खो-खो असोसिएशन) : 
“४४ व्या कुमार–मुली राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी सलग ११ वे आणि एकूण २७ वे अजिंक्यपद जिंकत राज्याची उज्ज्वल परंपरा कायम राखली, याचा आम्हाला अभिमान आहे. अंतिम सामन्यातील खेळाडूंची जिद्द, शिस्तबद्ध डावपेच आणि संघभावना कौतुकास्पद होती. मुलांच्या गटात रौप्यपदक मिळवतानाही संघाने दिलेली झुंजार लढत प्रेरणादायी आहे. या यशामागे खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि जिल्हा संघटनांची मेहनत मोलाची ठरली आहे. ही कामगिरी महाराष्ट्रातील खो-खोला राष्ट्रीय स्तरावर अधिक बळ देणारी असून भविष्यात आंतरराष्ट्रीय यशाचा मार्ग प्रशस्त करणारी आहे.” 
प्रशिक्षक अभिजित पाटील (धाराशिव) व सहा. प्रशिक्षक ऐश्वर्या सावंत (रत्नागिरी) यांची प्रतिक्रिया :
“या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी दाखवलेली एकजूट, शिस्त आणि शेवटपर्यंत न झुकणारी जिद्द अभिमानास्पद होती. प्रत्येक खेळाडूने दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवत संघासाठी खेळ केला, हेच या यशाचे खरे गमक ठरले. सराव शिबिरातील मेहनत प्रत्यक्ष सामन्यांत दिसून आली आणि त्यामुळेच हे अजिंक्यपद शक्य झाले. या यशातून महाराष्ट्रातील भविष्यातील खो-खो खेळाडूंना नवी दिशा व प्रेरणा मिळेल.”
वाडीकुरोलीची स्नेहा लामकाने जानकी पुरस्काराची मानकरी

या राष्ट्रीय स्पर्धेतील मुलींच्या गटातील देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा जानकी पुरस्कार वाडीकुरोली (तालुका पंढरपूर) येथील कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबच्या स्नेहा लामकाने हिला प्राप्त झाला आहे. यापूर्वी २०२२-२३ मध्ये वाडीकुरोलीच्याच प्रीती काळे हिने हा पुरस्कार  मिळवला होत. स्नेहा व तिचे प्रशिक्षक अतुल जाधव  यांचे सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर, सचिव उमाकांत गायकवाड व सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
Reactions

Post a Comment

0 Comments