Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षणाच्या नावाखाली आई वडिलांचे रक्त नका पिऊ...

 शिक्षणाच्या नावाखाली आई वडिलांचे रक्त नका पिऊ...


आजकालची तरुणाई नको त्या दिशेने भरकटत चालली आहे. व्यसनाच्या विखारी विळख्यात अडकून स्वतःचे जीवन विनाशाच्या खाईत लोटत आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन व्यसनाचा गुलाम बनत चालली आहे. विविध प्रकारचे व्यसन करून स्वतःच्या शरीराला बटबटीत करून घेत आहे. दारू, गांजा, सिगारेट व सुपारी खाऊन स्वतःच्या शरीराचा विनाश करून घेत आहे. आजकाल पहिली व दुसरीचे विद्यार्थी सुद्धा व्यसन करण्यात माहीर झाले आहेत. तरुणाईचे तर सोडाच.. नमुनेबाज विद्यार्थी ‌शाळेच्या व कॉलेजच्या भिंती सुपारी खाऊन रंगवत आहेत. शालेय जीवनापासूनच विद्यार्थी व्यसन करायला शिकत आहेत. मग पुढे चालून कॉलेज जीवनात हे विद्यार्थी व्यसन करण्यात आघाडीवर असतात. एवढ्या कमी वयात व्यसन करणारी मुले खरंच खूप दिवस जगतील का? नंतर कालांतराने त्यांचे भवितव्य धोक्यात येणार नाही का? पुढे चालून महाविद्यालयीन जीवनात गेल्यावर हे विद्यार्थी व्यसनाच्या इतके आहारी गेलेले असतात की, नंतर ते अट्टल बेवडे म्हणून उदयास येतात. हे विद्यार्थी बाद होण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांचे आई-वडील आहेत. कारण आजकाल आई-वडील आपल्या मुलांना अति लाडाकोडात वाढवत आहेत;  मुलांच्या मनाप्रमाणे त्यांना कसेही मोकाट व सैराट वागू देत आहेत. त्यांच्यावर चांगल्या संस्काराची पेरणी करत नाहीत. कारण संस्काराचे विद्यापीठ म्हणजे घरातील आजी आजोबा असतात. ते हल्ली राहिले नाहीत आणि आजी आजोबा अस्तित्वात असले तरी त्यांच्यापासून आजकालची मुले लग्न झाल्यावर अलिप्त राहत आहेत. मग मुलांवर संस्काराची निखळ पेरणी कोण करणार! आई वडील मुलांचा अतिलाड करत असल्यामुळे मुलेही बिनधास्त, बेफिकीर व मनमानी जीवन जगत आहेत. अतिलाडामुळे त्यांना आई-वडिलांचा धाक नसल्यामुळे ते वाट्टेल तसे आपल्या मर्जीप्रमाणे जीवन जगत आहेत. लहानपणीच मुलांवर संस्काराची पेरणी चांगली झाली आणि मुलांना आपल्या दबावात ठेवले तर पुढे चालून विद्यार्थी बिघडत नाहीत. आजकाल शिक्षणाच्या नावाखाली मुले आई-वडिलांचा पार चेंदामेंदा करून टाकत आहेत. आई वडील आपल्या मुलांना शहरी भागात शिक्षणाला पाठवून गावाकडे राहतात. माझा मुलगा खूप खूप शिकावा म्हणून त्याला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन देतात. शेतात घाम गाळून व कष्ट करून त्याला शिक्षणासाठी दर महिन्याला किंवा आठवड्याला पैसे पाठवतात. का तर त्यांना वाटते की आपला मुलगा खूप खूप शिकून शासनाच्या मोठ्या पदावर बसावा आणि त्याने आमचा व गावकऱ्यांचा नावलौकिक करावा. या इच्छेपोटी ते आपल्या मुलांना लागेल तेवढा पैसा पुरवतात. कारण त्यांनाही वाटते की आपला मुलगा खूप खूप शिकत आहे, अभ्यास आणि अभ्यासच करत आहे. पण मुलगा मात्र आई-वडिलांनी पाठवलेल्या पैशाचे शैक्षणिक साहित्य न घेता आणि शैक्षणिक कामकाजाला पैसा न लावता मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी व मटन खाण्यासाठी उधळतात. आपल्या गर्लफ्रेंडला कॉफीशॉपला घेऊन जाणे, दारू पिणे, सुपारी खाणे, चित्रपट बघायला जाणे आणि मित्रांचा वाढदिवस साजरा करण्यावर सगळा पैसा उधळतात. आई-वडिलांच्या कष्टांचे चीज करण्याऐवजी आई-वडिलांचे रक्त पितात. आई-वडिलांना काय माहित आपला मुलगा शिक्षण शिकतोय का शिक्षणाच्या नावाखाली ऐश करतोय. त्यासाठी  समस्त पालकांना विनंती आहे की, आपण आपल्या मुलांना निगराणी खाली ठेवा, त्यांचा अति लाड करू नका, त्यांना सुरुवातीपासूनच आपल्या धाकात ठेवा, दबावात नाही. आपण गावाकडे आणि मुले शहरी भागात शिक्षणासाठी असतील तर मुले आणखीन बिघडतील हे नेहमी ध्यानात ठेवा. आपण मुलांसाठी सर्व काही करतोय पण मुलगा आपण पाठवलेल्या पैशाचे चीज करण्याऐवजी आई-वडिलांचे रक्त पीत असेल तर अशा मुलांना न शिकवलेलेच बरे...वस्तुस्थिती सांगायची म्हणजे  मुले जोपर्यंत आई-वडिलांच्या निगराणीखाली शिक्षण शिकतात तोपर्यंत नीट मन लावून अभ्यास करतात. दहावी बोर्ड परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात. कारण गावातील शाळेत शिकायला असताना मुले गावकऱ्यांच्या व आई-वडिलांच्या धाकात असतात, म्हणून आई-वडिलांच्या व गावकऱ्यांच्या निगराणीखाली विद्यार्थी शिक्षणाचे धडे अतिशय चांगल्या प्रकारे गिरवतात. पण जेव्हा गावातील शालेय शिक्षण पूर्ण करून विद्यार्थी शहरी भागात शिक्षणाला जातात तेव्हा विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहाच्या बाहेर आपोआप फेकले जातात. शहरी भागातील संस्कृती विकृत असते. अशा विकृत संस्कृतीचे पालन आपली मुले करतात.. उच्च प्रकारच्या नशा करतात, चांगल्या क्वालिटीची दारू पितात...महागडे चरस व गांजा ओढतात.. मुलींच्या मागे फिरतात...चित्रपट व पर्यटन स्थळे बघायला जातात आणि आई-वडिलांच्या कष्टांना व त्यांच्या मेहनतीला प्रामाणिकपणे न्याय देण्याऐवजी त्यांना बेईमान होऊन त्यांचे रक्त पितात... ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही. काही विद्यार्थी शालेय जीवनापासून ते कॉलेज जीवनापर्यंत नीट मन लावून अभ्यास करतात आणि यशाच्या उंच शिखरावर पोहोचतात..आई-वडिलांच्या कष्टांचे चीज करतात.. अशा ज्ञानी, गुणी व कर्तृत्ववान मुलांच्या प्रामाणिकपणाला सलाम करावा वाटतो.. जाता जाता समस्त पालकांना एवढीच विनंती आहे की, बंधूंनो आपल्या मुलांचा अतिलाड करणे टाळा...त्यांना शहरी भागात शिक्षणासाठी पाठवल्यास आपला मुलगा आपण पाठवलेल्या पैशाचे काय करतो याची शहानिशा करा, शक्यतो त्यांना धाकातच ठेवावे...जमत असेल तर मुलासोबत शहरी भागात राहावे आणि आपल्या निगराणीखाली त्याला शिक्षणाचे धडे घेऊ द्यावे.. तरच आपली मुले तुमच्या कष्टांची चीज करतील नाहीतर शिक्षणाच्या नावाखाली तुमचे रक्त आटवल्याशिवाय राहणार नाहीत..
Reactions

Post a Comment

0 Comments