Hot Posts

6/recent/ticker-posts

परकीयतेतून परिपूर्णतेकडे – मराठी भाषेची वाटचाल

 परकीयतेतून परिपूर्णतेकडे – मराठी भाषेची वाटचाल



आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू….
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन
शब्द वाटू धन, जन लोका…
तुका म्हणे पाहा शब्दचि हा 
शब्देंचि गौरव पूजा करू…
   असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. शब्दांना रत्न, शस्त्र, जीवाचे जीवन,धन अशा विविध उपमा देऊन संत तुकाराम महाराजांनी आपल्या माय मराठीचे गोडवे गायले आहेत. मराठी भाषेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आपणा सर्वावर आपली भाषा जपायची आणि समृद्ध करायची जबाबदारी आहे.
   भौतिक,वैज्ञानिक,तांत्रिक प्रगती आणि सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक परिवर्तन या मधून काही शब्द कालवश होत असतात; तर काही शब्द नव्याने दाखल होत असतात. नव्याने दाखल होणाऱ्या परकीय भाषेतील शब्दांना अस्सल मराठी रूप देण्याचे काम शब्दकारागिरांनी अर्थातच साहित्यिकांनी केले पाहिजे.
   खरं तर काही मोजक्या शब्दाच्या वापरातून कोणत्याही भाषेचा जन्म झालेला असतो. देशी शब्द हे खरच त्या भाषेचा पाया असतात. मराठी भाषेत अबोल, उजेड,अंघोळ, मुस्काट फटकळ, वारकरी, हत्यार, ओसरी दगडधोंडे यासारखे शब्द हे खरे देशी शब्द आहेत. या मोजक्या शब्दांच्या जोरावर जन्मलेल्या आपल्या मराठी भाषणे पुढे संस्कृत आणि प्राकृत भाषेतून उसणे घेतलेले शब्द जसेच्या तसे आपल्या मराठी भाषेत आपण वापरत असतो. उदाहरणार्थ पुष्प, ग्रंथ पृथ्वी भूगोल गुरू कवी पुत्र सत्कार भूमिती,अनिल, आत्मा,क्रीडा, धनु... तर काही संस्कृत आणि प्राकृत भाषेतील शब्दांमध्ये बदल करून ते आपण वापरत आलो आहोत. उदाहरणार्थ मार्जार पासून मांजर,तृष्णापासून तहान, केश पासून केस,भगिनीपासून बहीण, मत्स्य पासून मासा,ताम्र पासून तांबे, सर्प पासून साप,दुग्ध पासून दूध असे अनेक शब्द आपण बदल करून वापरत आलो आहोत.
  परकीय लोक जेव्हा आपल्या देशात व्यापारासाठी येऊ लागले तेव्हा वस्तूंच्या व्यापारासोबत आपण भाषेतील शब्दांचा व्यापार देखील करू लागलो. या व्यापारातूनच अनेक शब्द आपण अरबी,फारसी,पोर्तुगीज या भाषेतून आयात केले आहेत. उस्ताद, शाहीर,मजबूत,मेहनत, फैसला, करार,खजिना, जकात, तारीफ, दुवा,नफा, मनोरा, मशाल नकाशा,तालुका, जाहीरनामा, खर्च, यासारखे अरबी शब्द आपण नेहमी बोलताना वापरत असतो. गरीब रियाज,कुमारी, फडणवीस,खुशामत दप्तर,गुन्हेगार,लेझीम,आसामी मस्करी,चिटणीस,जासूद, ठाणेदार पालखी, पोटगी,कुमक,अवलाद, इज्जत, गैरसमज,किल्ला 
गरीब, मज्जिद, जंग,दिलरुबा दोस्त जाहिरात कबिला चाबूक कर्ज अगरबत्ती अब्रू दस्तर खुद्द चीज वस्तू दंगा धोपा, दिवाणखाना फौज, बेअक्कल बिलंदर यासारखे फारशी शब्द विशेषता राज्यकारभारात मध्ययुगीन कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. पगारी नाताळ, बटाटे,बायको, आरमार, खंड बशी, फलटण, साबण, रोटी पिस्तोल पोलीस,कर्नल, हापूस,साबुदाणा लिलाव हे शब्द पूर्तीगिजांकडून आपण घेतले आहेत. आपल्या महाराष्ट्राला लागून असणाऱ्या कन्नड, गुजराथी आणि तेलगू भाषिकांकडून देखील आपण अनेक शब्द घेतले आहेत. अण्णा, आमसूल, उडीद, चिरगुट,उपीट उसळ खलबत्ता परडी अक्का अडगुळे खोबरे कलिंगड चप्पल अडकित्ता मुंडास यासारखे कानडी शब्द आपण आपलेसे केले आहेत. चरखा खादी परिहार नानावटी शेठजी दादर मथळा मलमपट्टी हे गुजराती शब्द तर बंडी येळकोट कुलकर्णी आळूमाळू विटी दांडू गदारोळ हे तेलगू शब्द अस्सल मराठीच समजून आपण आज पर्यंत बोलत आलो आहोत.
    याप्रकारे आपली माय मराठी समृद्ध होत गेली आहे. नवीन शब्दांची निर्मिती आपल्या गरजेनुसार केली जाते. काही विज्ञानातील आणि तंत्रज्ञानातील शब्द जसेच्या तसे आज देखील आपण वापरतो. त्यांना समर्पक मराठी शब्द बनवले गेले नाहीत. विशेषतः संगणक,माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ते संदर्भातील प्रतिशब्द बनवले गेले असले तरी त्याचा वापर होत असताना दिसत नाही. ते शब्द जसेच्या तसे आपण वापरत आहोत. हे इंग्रजी शब्द रोजच्या बोलचालीत आले आहेत, पण त्यांना शुद्ध, सर्वमान्य मराठी प्रतिशब्द अजून रूढ (accepted) झालेले नाहीत.असे शब्द मराठीमध्ये “परकीय शब्दप्रयोग” म्हणून वापरले जातात. उदाहरणार्थ : मोबाइल,कॉम्प्युटर,स्क्रीन,इंटरनेट, वाय-फाय, स्क्रोल, चार्जर,फॅन, टिकट,कार्ड,बटन, पासवर्ड...या शब्दांना काही मराठी पर्याय तयार झालेले आहेत (उदा. संकेतस्थळ – वेबसाइट, भ्रमणध्वनी – मोबाइल), पण ते रूढ झालेले नाहीत — म्हणजे लोक बोलण्यात किंवा लेखनात अजून इंग्रजीच वापरतात. "मोबाईलचा स्क्रीन स्क्रोल करत आहे." हे सांगण्यासाठी आपण "भ्रमणध्वनीचा पडदा वर खाली करत आहे." असं म्हटलं तर ते हशास्पद किंवा समोरच्याला गावंढळ वाटेल. म्हणून “स्क्रोल” → “सरकपड”, “डाउनलोड” → “उतरफाइल” अशा नव्या कल्पना कोणाच्या डोक्यात येत असतील तर त्यांनी त्या वापरायला सुरुवात केली पाहिजे.
    खरंतर आपण विज्ञान तंत्रज्ञानात कमी शोध लावतो.त्यामुळे अस्सल मराठी शब्द आपल्याकडून बनले जात नाहीत. थोडक्यात एखादा भाषेची समृद्धी ही या भाषा बोलणाऱ्या लोकांच्या कार्यकर्तृत्वावर, बुद्धिमत्ता आणि भाषा प्रेमावर अवलंबून असते. आपण निर्माण केलेल्या गोष्टी या अस्सल मराठी शब्दातच व्यक्त होतात. आपली मराठी भाषा ही 
संतांनी निर्माण केली आहे. तिच्यामध्ये फार मोठी क्षमता आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान देण्याचे काम भाषा करत असते. माणसाची उत्क्रांती ही बुद्धीच्या विकासाने झाली आहे ;आणि बुद्धीचा विकास हा भाषेमुळे झाला आहे हे आपण मान्य केले पाहिजे. 
   अभिजात भाषेचा दर्जा मिळणे, मोठमोठे साहित्य संमेलनही भरवणे, ग्रंथालयांची संख्या वाढवणे आणि साहित्य निर्मिती करणे या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत.परंतु मराठी भाषेची खरी समृद्धी मराठी माणसाच्या कर्तृत्वात आहे... याची जाणीव आपण कायम ध्यानात ठेवली पाहिजे.
Reactions

Post a Comment

0 Comments