अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- जत येथील मराठा मंदिर संचलित श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ही केवळ प्रशाला नसून आदर्श विद्यार्थी घडविणारे विद्यापीठ असल्याचा गौरव करून या राज्याची व देशाची प्रगती करणारे विद्यार्थी या प्रशालेच्या माध्यमातून घडत असल्याचे प्रतिपादन अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी केले.
जत(जिल्हा सांगली) येथील मराठा मंदिर संचलित श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या ३१ व्या श्री ज्ञानेश्वर माऊली व्याख्यानमालेच्या समारोप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याप्रसंगी ते बोलत होते. व्याख्यानमालेच्या समारोपचे तिसरे पुष्प गुंफण्यासाठी ह.भ.प.श्री.वासुदेव जोशी(औदुंबर) यांचे ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा या विषयावर व्याख्यान होते. याप्रसंगी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे,सचिव शामराव मोरे,विश्वस्त भाऊ कापसे,खजिनदार संजयलाला राठोड,अक्कलकोटचे सेवानिवृत्त प्राचार्य सायबन्ना जाधव,विश्वस्त संतोष भोसले,शालेय समिती सदस्य प्रभाकर जाधव,तहसीलदार प्रविण धानुरकर,गटशिक्षणाधिकारी राम फरकांडे, विस्तार अधिकारी अन्सार शेख,अन्नछत्र मंडळाचे सदस्य अरविंद शिंदे,अक्कलकोट लायन्स क्लबचे उपाध्यक्ष चेतन जाधव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे प्राचार्य शिवाजी शिंदे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत उपप्राचार्य शिवाजी भांगरे यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय उमेश घोसरवाडे यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक संभाजी सरक यांनी करून दिला. प्रशालेच्यावतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी छत्रपती शिवाजी चौकात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी चौक ते मराठा मंदिर श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या मार्गावर उघड्या जीपमधून अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांची भव्य व शाही पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा अनेक नागरिक व विद्यार्थी स्वागतासाठी उपस्थित होते. संपूर्ण मार्गावर रांगोळी काढण्यात आलेल्या होत्या. तसेच एनसीसीच्या पथकाने शानदार सलामी देत त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी वाद्यवाजंत्री,तुतारी,ढोल,बँड व मावळ्याच्या वेशातील विद्यार्थी यांनी जोरदार स्वागत केले. संपूर्ण मार्गावर जतवासीयांकडून व विद्यार्थ्यांकडून पुष्पवृष्टी करण्यात येत होती. प्रशालेच्या मुख्य द्वाराजवळ आल्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. याप्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे प्राचार्य शिवाजी शिंदे,उपप्राचार्य शिवाजी भांगरे,पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील व संभाजी सरक यांनी केले. व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी प्रशालेचे व्याख्यानमाला समितीचे अनिता माळी,केंचप्पा तनंगी,परशुराम भोकरे,नंदकुमार सूर्यवंशी,आर.टी.कोळी,राजु इंगळे,गजानन चव्हाण,कुंडलिक साळे,सारंग भिसे आधी प्रयत्नशील होते.
चौकट १ : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक,शैक्षणिक उपक्रमास भरीव सहकार्य करीत असतात. प्रशालेतील परिसर व संगणक कक्षाची पाहणी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी याप्रसंगी केली. त्यानंतर आपले मनोगत व्यक्त करीत असताना त्यांनी प्रशालेच्या शैक्षणिक प्रगतीत खारीचा वाटा म्हणून पाच संगणक सेट व एक प्रिंटर देणगी स्वरूपात देण्याची घोषणा केली. याप्रसंगी उपस्थित श्रोते,विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी टाळ्यांच्या गजरात धन्यवाद केले.
चौकट २ :ह.भ.प.श्री.वासुदेव जोशी(औदुंबर) यांनी व्याख्यानमालेच्या समारोपाचे व्याख्यान ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा या विषयावर आपल्या मधुर वाणीने केले. त्यांच्या व्याख्यानप्रसंगी श्रोत्यांची मोठी गर्दी होती. आपल्या मधुर व्याख्यानाने श्रोत्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केले.
चौकट ३: जत येथील मराठा मंदिर संचलित श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे श्री ज्ञानेश्वर माऊली व्याख्यानमाला तीन दिवस आयोजित करण्यात आलेली होती. दिनांक १५ नोव्हेंबर रोजी पहिल्या दिवशी ख्यातनाम व्याख्याते गणेश शिंदे यांचे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध व्याख्याते सचिन परब यांचे महात्मा बसवेश्वर ते संत ज्ञानेश्वर जीवनपट या विषयावर व्याख्यान झाले. दोन्ही व्याख्यानाला श्रोत्यांची मोठी गर्दी झाली होती.
.png)
0 Comments