Hot Posts

6/recent/ticker-posts

वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी घेतला भाजपचा झेंडा

 वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी घेतला भाजपचा झेंडा




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ मध्ये यंदा चुरस आणखी वाढली आहे. चार वेळा काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले आणि वटवृक्ष श्री स्वामी महाराज देवस्थानचे विद्यमान अध्यक्ष महेश इंगळे यांनी सोमवारी अंतिम दिवशी भव्य शक्तिप्रदर्शन करत भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. ढोल-ताशांच्या निनादात, कार्यकर्त्यांच्या उत्साहपूर्ण उपस्थितीत त्यांचा अर्ज दाखल कार्यक्रम दणदणीत झाला.
शक्तिप्रदर्शनाद्वारे दाखल केला अर्ज
प्रभाग क्रमांक ११ हा इंगळे यांचा पारंपरिक आणि हक्काचा प्रभाग मानला जातो. गेल्या काही दिवसांपासून त्यांना किंवा त्यांच्या मुलाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत असताना अखेर इंगळे यांनी स्वतःच रिंगणात उतरून या चर्चाना पूर्णविराम दिला.
इंगळे यांचा शहरातील तसेच विविध प्रभागांमध्ये दांडगा जनसंपर्क आहे. वटवृक्ष श्री स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले सामाजिक व धार्मिक कार्य, त्यांचा सातत्यपूर्ण नागरिक संपर्क आणि सर्वसामान्यांशी जवळीक याचा थेट लाभ आता भाजपला मिळणार असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. इंगळे यांच्या प्रवेशामुळे भाजपची संघटनात्मक ताकद वाढली असून या प्रभागात पक्षाला मजबूत पायाभरणी मिळाल्याचे मानले जाते.
दीर्घकाळ काँग्रेसमध्ये सक्रिय राहून चार वेळा निवडून आलेल्या इंगळे यांचा राजकीय अनुभवही भाजपसाठी मोलाचा ठरणार आहे. निवडणूक रचना, प्रभागातील भूगोल, मतदारांचे प्रश्न आणि स्थानिक राजकारणाचे बारकावे याचे उत्तम ज्ञान असल्याने त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या विजयाची शक्यता अधिक दृढ झाल्याचे चित्र कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी इंगळे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करत अधिकृत घोषणा केली आहे. स्थानिकांचा पाठिंबा आणि त्यांच्या नेतृत्वक्षमता पाहता उमेदवारी देण्यात आल्याचे पक्षातून सांगण्यात येते.
अर्ज दाखल केल्यानंतर महेश इंगळे म्हणाले, प्रभाग क्रमांक ११ हा माझ्या दीर्घ सेवा आणि जनतेच्या विश्वासाची ओळख आहे. पक्ष बदलला असला तरी लोकांसाठी काम करण्याची माझी बांधिलकी बदललेली नाही. भाजपच्या माध्यमातून अधिक मोठ्या प्रमाणावर विकास घडवण्याचा माझा प्रयत्न असेल. कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा एकदा विश्वासाचा विजय प्राप्त करू, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.


Reactions

Post a Comment

0 Comments