खरवली हायस्कूलच्या शिक्षक रुपी ज्ञानकोशाची दोन सोनेरी पानं म्हणजे सौ. उर्मिला दत्तात्रय साळुंके मॅडम आणि श्री. दत्तात्रय साळुंके सर
रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील खरवली हायस्कूल तथा नूतन माध्यमिक विद्यालय खरवली हायस्कूल च्या शिस्तप्रिय मातृवत्सल आणि विद्यार्थी प्रिय माजी आदर्श शिक्षिका सौ. उर्मिला दत्तात्रेय साळुंके मॅडम यांचे मंगळवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाची दु:खद वार्ता समजताच त्यांचा साळुंके परिवार, नातेवाईक, त्यांचे कापडे ग्रामस्थ पोलादपूर तालुका, तसेच त्यांनी ज्या शैक्षणिक संस्थेत ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले ते माणगाव तालुक्यातील नूतन माध्यमिक विद्यालय खरवली तथा खरवली हायस्कूल आजी माजी शिक्षक वृंद आणि खरवली हायस्कूल आजी माजी विद्यार्थी वर्गात दु:खाची शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी साळुंके परिवार, आप्तेष्ट,सगे सोयरे, खरवली हायस्कूल आजी माजी विद्यार्थी शिक्षक वृंद आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र डॉ. समीर साळुंके, सुनबाई, नातवंडे आणि त्यांच्या सुकन्या,जावई आणि नातवंडे असा उच्य शिक्षित मोठा परिवार आहे. त्यांचे कार्य रविवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी पोलादपूर येथे त्यांच्या राहत्या घरी आयोजित करण्यात आले आहेत. खरवली हायस्कूल च्या माध्यमातून रविवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ४:०० वाजता खरवली हायस्कूल मध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सुमारे ऐंशी ते दोन हजार च्या द्वी दशकात माणगाव तालुक्यातील खरवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन माध्यमिक विद्यालय खरवली हायस्कूल या नामांकित शैक्षणिक संस्थेत आदरणीय सौ. उर्मिला दत्तात्रय साळुंके मॅडम दिनांक २२/०७/१९८० रोजी शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. तत्पूर्वी त्यांचे पती आदरणीय श्री दत्तात्रय साळुंके सर दिनांक ०१/०७/१९६४ रोजी याच खरवली हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले होते. या उच्च विद्या विभूषित ( पती पत्नी ) उभयतांनी खरवली हायस्कूल मध्ये आदर्श शिक्षक म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे व इमानेइतबारे अविस्मरणीय आणि उल्लेखनीय असे ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. त्यांनी आपल्या सेवा काळात प्रचंड मेहनत घेऊन खरवली हायस्कूल ला शैक्षणिक गुणवत्तेच्या उच्यतम शिखरावर नेऊन ठेवले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच शिस्तप्रियता आणि विनम्रता रुजवली.
रायगड जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम समजल्या जाणाऱ्या पोलादपूर तालुक्यातील कापडे गावातील या उच्च विद्या विभूषित आणि सर्व विषयात पारंगत असलेल्या साळुंके उभय आदर्श शिक्षक दांपत्याने शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी अहर्निशपणे खडतर प्रयत्न केले. शैक्षणिक धोरणानुसार एकही विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीत शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून खरवली विभागातील ग्रामीण गोरगरीब पालक आणि विद्यार्थी वर्गाला शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि विद्यार्थी वर्गात शिक्षणा विषयी प्रेम ,आवड ,गोडी, आसक्ती , आत्मियता आणि अभिरुची निर्माण करण्यासाठी किंबहुना त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या उभयतांनी प्रसंगी पायपीट करत खरवली विभागातील खरवली, साले, उमरोळी, जाधव सुरव,लहाने सुरव, चेरवली, नाईटणे, पेण ,आमडोशी,बोरघर आणि उसर या गावा गावात विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन गृह भेटी दिल्या आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांना स्वतः च्या मुलांप्रमाणे प्रेम आणि वागणूक दिली. विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत कुठल्याही प्रकारची उणीव राहू नये म्हणून हे उभय दाम्पत्य कायम शाळेच्या मुख्यालयी अर्थात खरवली या ग्रामीण भागात वास्तव्य करून राहिले. आणि त्यांनी खरवली हायस्कूल च्या माध्यमातून तब्बल तीन ते चार दशके ज्ञानदानाचे पवित्र कार्य करुन आपल्या निस्सीम कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या मौलिक पवित्र ज्ञानदानाच्या कार्याला त्यांचा ऋणी विद्यार्थी पत्रकार विश्वास बळीराम गायकवाड बोरघर, माणगाव आणि सह परिवारातर्फे आदरपूर्वक सलाम. आणि कालकथीत आदरणीय आदर्श शिक्षिका उर्मिला साळुंके मॅडम यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली. आदरणीय सौ.उर्मिला साळुंके मॅडम मराठी गद्य पद्य आणि संस्कृत या विषयांचे अध्यापन करत आणि आदरणीय श्री. दत्तात्रय साळुंके सर संस्कृत, बीजगणित आणि इंग्रजी या विषयांचे अध्यापन करत. संस्कृतचे गाढे विद्वान असलेल्या या दोन्ही उभयतांची अध्ययन अध्यापनाची कला तथा पद्धत अत्यंत अद्भूत अवीट आगळी वेगळी आणि विलक्षण रुची वर्धक होती. दोघेही स्वभावाने अत्यंत प्रेमळ तितकेच कडक शिस्तीचे होते. असे ऋषीतुल्य गुरू आम्हाला लाभले हे आमचे परम भाग्य..
माजी पर्यवेक्षिका आदरणीय साळुंके मॅडम आणि माजी मुख्याध्यापक आदरणीय साळुंके सर यांच्या सेवा कालखंडात विद्यार्थी वर्गात कमालीची शिस्त आणि आदरयुक्त भीती होती. शालेय शिस्तीचा भंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेताच्या घुंगुर काठीचा महाप्रसाद मिळत असे.
सदर शिस्तप्रिय ज्ञानोपासक उभय दाम्पत्यांकडून ज्ञानार्जन करून गेलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उच्यतम पदावर कार्यरत असून माना सन्मानाने जीवन जगत आहेत. आदरणीय साळुंके मॅडम आणि आदरणीय साळुंके सर यांच्या शिस्तप्रिय संस्कारातून खरवली विभागातील अनेक विद्यार्थी ( पिढ्या ) बॅचेस नूतन माध्यमिक विद्यालय खरवली हायस्कूल च्या माध्यमातून शिक्षण घेऊन स्वताच्या पायावर उभे राहुन संस्कारक्षम झाल्या आहेत. आदरणीय सौ. उर्मिला दत्तात्रय साळुंके यांनी दिनांक १४/०६/ १९९९ रोजी स्वेच्छा निवृत्ती घेतली तर आदरणीय श्री दत्तात्रय साळुंके सरांनी तब्बल ३६ वर्ष प्रदीर्घ ज्ञानदानाचे महान कार्य करुन दिनांक २८/०२/२००२ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. सुलेखन - पत्रकार विश्वास बळीराम गायकवाड बोरघर, माणगाव रायगड भ्रमणध्वनी - ९८२२५८०२३२,८००७२५००१२.

0 Comments