मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या अजब तऱ्हेचा सर्वच पक्षश्रेष्ठींना वैताग
काही जणांना प्रभाग सोयीचा तर चिन्ह अडचणीचे
काहीजणांना नेते सोयीचे तर कार्यकर्ते गैरसोयीचे
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता चांगलाच वेग आला आहे उमेदवारी अर्ज भरायला कालपासून प्रारंभ झाला आहे. मात्र अनेक पक्षांच्या पेटीवर उमेदवारीची पाखरं म्हणावी तशी बसायला गर्दी करत नसल्यामुळे सर्वच पक्षनेत्यांना आता उमेदवारी द्यायची कोणाला ? हे कोडे पडले आहे. अनेक प्रभागातून नव्या दमाचे युवक आता निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आणि दरवेळी तेच ते ठरलेले उमेदवारीचे पाचवीला पुजल्यागत चेहरे पाहून सर्वसामान्य जनतेला वीट आला आहे. त्यामुळे एक तर यांना बदलायचं किंवा निकालातून तरी यांना घरी बसवायचं असा पवित्रा मतदारांनी घेतलाय. त्यामुळे अनेक जण या निवडणुकीत सावध पवित्र घेऊन निवडणुकीपासून सुरुवातीचे काही दिवस चार हात दूर राहणे पसंत करत आहेत.
मोहोळ शहराच्या राजकारणात सध्या सर्वाधिक आघाडीवर आहे तो पक्ष म्हणजे भाजपा. सर्वात अगोदर बैठक घेऊन मुलाखती देखील घेऊन नेते मोकळे झाले आहेत. यापूर्वी लहान असलेल्या पक्षाला आता चार दिवसात इतकी पदवी आली आहे की जो तो आता स्वतःला नेताच समजायला लागला होता. मात्र पक्षाने सर्वांच्यावर एकच नेता अप्रत्यक्ष निर्माण करू ठेवला आहे त्यांना सर्वाधिकार आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही. इतके दिवस पक्षाच्या जीवावर ठेकेदारी करून विविध व्यवसाय करून पैसे कमवलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी कधीही आपल्या वाहनावर पक्षाचे चिन्ह टाकले नव्हते. मात्र आता नेत्यांकडे उमेदवारी मागायला जायची म्हणून काहीजणांनी ठळक स्वरूपात चिन्ह टाकले आहे त्यांचीही ढोंगी निष्ठा आता लपून राहिली नाही.
त्या खालोखाल मशाल देखील आता कालच बैठक घेऊन प्रज्वलित करण्यात आली आहे. तर धनुष्यबाण दररोज कोणाला कोणाला प्रवेश देऊन निवडणुकीचे वातावरण ताणताना दिसत आहे. मात्र जसजसे धनुष्यबाणाकडे हौशी उमेदवारांची गर्दी वाढायला लागली आहे तस तशी भाजपा बरोबर मशालीची धाकधूक वाढायला लागली आहे. कारण मत विभागणीचा फटका हा प्रस्थापित पक्षांना बसत असतो तो नवख्या पक्षांना बसत नसतो ते फक्त निकाल घडवतात. त्यामुळे आता कोण कोणाची मते खाणार आणि त्याचा फटका कोणाकोणाला बसणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
चौकट
जशी चुरस निवडणुकीच्या दोन महिन्यापूर्वी मोहोळ शहरात जाणवत होती ती चुरस अचानक कमी कशी काय झाली याबाबत लोकांना आता शंका यायला लागली आहे. सालाबाद प्रमाणे निवडणुकीतील चुरस कमी करण्यासाठीचा अदृश्य लाभ नक्की कोणाला आलाय याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. चौथ्या आघाडीची निर्मिती होणार म्हणून मला मोठा ॲटम बॉम्ब फुटला खरा मात्र बैठकीनंतर उमेदवाऱ्या जाहीर न झाल्यामुळे या आघाडी बाबत अद्याप कोणतीच नवी घोषणा झाली नाही.निवडणुकीच्या निकालानंतर कमी जास्त प्रमाणात जागा आल्या तर दोन धनुष्यबाणाचे यापूर्वी गट पडलेले घटक म्हणजे धनुष्यबाण खुर्द आणि धनुष्यबाण बुद्रुक यांचा कधीही एकोपा होणे आता शक्य नाही. आणि धनुष्यबाण चिन्ह घेतलेल्या नव्या शिवसेनेचा राज्यात महायुतीत असूनही भाजपची घरोबा होणे शक्य नाही. त्यामुळे राज्यात कुठेही पहावयास मिळणार नाही अशी जागतिक आघाडी या मोहोळमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा आणि मशालीच्या समन्वयातून पहावयास झाली तर आश्चर्य वाटायला नको.
चौकट
निवडणुकीपूर्वी कार्यकर्ते आणि मतदारांना कसलेच विचारात न घेणाऱ्या शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांना आता नगरसेवक होण्याचे पक्के डोहाळे लागले आहेत. काहींनी कामे घेतली तर काहींनी कामे टक्केवारी घेऊन विकली काहींनी अधिकाऱ्यांना दमात घेऊन कामे लाटली आणि ती विकून त्यामधून लॉन्ड्रीची बीले भागवली. टेंडर प्रक्रियेमध्ये क्रॉस टेंडर भरून एकमेका विरोधात कागदावरच्या लढाया खेळणारी मंडळी बिल काढताना मात्र एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरत असतात हे उघड्या डोळ्यांनी शहराने पाहिले आहे.त्यामुळे आता ठेकेदारीचे आणि बिल काढण्याचे सोंग करण्यात पटाईत झालेल्या दिग्गज नेत्यांना मताचे सोंग कुठून आणायचे याचे कोडे पडले आहे.
.jpg)
0 Comments