Hot Posts

6/recent/ticker-posts

आंतर महाविद्यालयीन हॉलीबॉल स्पर्धेत लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाचा संघ सुवर्णविजेता

 आंतर महाविद्यालयीन हॉलीबॉल स्पर्धेत लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाचा संघ सुवर्णविजेता




वडाळा (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित  महाविद्यालय वडाळा येथे दिनांक ११ ते १२ सप्टेंबर या कालावधीत आंतर महाविद्यालयीन हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत एकूण २५ कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयांनी सदरील स्पर्धेत सहभाग नोंदवला. यात मुलांचे २५ तर मुलींच्या गटात १९ संघ सहभागी झाले होते. या हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत मुलांच्या गटात लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाचा संघ सुवर्ण विजेता ठरला. कृषी महाविद्यालय सोनाई चा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. अत्यंत रोमहर्षक व चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संघाने कृषी महाविद्यालय सोनाई च्या संघावर विजय मिळवला. लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संघामधील संघनायक वैभव पाटील, यशराज देशमुख, अमित भांगे, प्रदीप सावंत, रोहन बांगर, हरिभाऊ चव्हाण, सुरज अनपट, बालाजी गाडे, विराज पाटील, शेखर पालवी, कृष्णा पालवे, शिवराज झालकी, रंजीत काळकुंबे आणि राहुल सातपुते यांनी उत्कृष्ट खेळाच्या जोरावर विजय संपादित करून उपस्थितांची विशेष दाद मिळवली.  कृषी महाविद्यालय तळसंदे चा संघ स्पर्धेत तृतीय क्रमांकावर राहिला. मुलींच्या गटात कृषी महाविद्यालय पुणे संघाने बाजी मारत प्रथम स्थान प्राप्त केले. कृषी महाविद्यालय बारामती आणि कृषी महाविद्यालय सोनाई अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. लोकमंगल शैक्षणिक संकुलाच्या क्रीडांगणावर संपन्न झालेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण १२ सप्टेंबर रोजी  मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सदरील बक्षीस वितरण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारी हे लाभले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संस्थेच्या सचिव डॉ. अनिता ढोबळे यांनी भूषविले. विजयी सर्व संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. विलास आवारी यांनी स्पर्धेच्या स्तुत्य आयोजनाबाबत लोकमंगल शैक्षणिक संकुलाचे आणि स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेणाऱ्या लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयामधील सर्व स्वयंसेवकाचे विशेष आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी खेळ भावनेने खेळून महाविद्यालयाचे तथा विद्यापीठाचे नाव असेच उंचवत ठेवावे अशी सदिच्छा देखील त्यांनी व्यक्त केली. बक्षीस वितरण कार्यक्रमाचा शेवट हा लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. आंतर महाविद्यालयीन स्पर्धा आयोजन करण्यात लोकमंगल शैक्षणिक संकुल नियमित अग्रेसर असून मुलांना शिक्षणासमवेत खेळांमध्ये देखील निपुण करण्याचा महाविद्यालयाचा प्रामाणिक उद्देश असल्याची प्रांजळ भावना त्यांनी मांडली. लोकमंगल  शैक्षणिक संकुलाच्या वतीने अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व संघ, संघ व्यवस्थापक विद्यापीठ प्रतिनिधी, पंच आणि निवड समिती सदस्य यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन लोकमंगल कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.गायत्री जाधव हिने केले. याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित सर्व महाविद्यालयातील सहभागी खेळाडूंची उल्लेखनीय उपस्थिती होती. लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयातील खेळाडूंनी मिळवलेल्या यशाबाबत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. श्री सुभाष देशमुख, अध्यक्ष श्री. रोहन देशमुख आणि सचिव डॉ. अनिता ढोबळे यांनी विशेष कौतुक केले.  स्पर्धेच्या यशस्वी आयोजन व संपन्नतेसाठी लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा अधिकारी श्री. संभाजी कोकाटे, प्राध्यापकवृंद, रासेयो स्वयंसेवक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 
Reactions

Post a Comment

0 Comments