जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत द्या
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून याला "ओला दुष्काळ" घोषित करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आनंद काशीद यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना सादर करण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, 15 मे 2025 पासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके, फळबागा, जनावरे, घरे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाईसाठी सरकारने पुढील उपाययोजना तातडीने कराव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत:
शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी.
फळबागधारकांना हेक्टरी 1.5 लाख रुपये मदत मिळावी.
माती अथवा ताल वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 2.5 लाख रुपये द्यावेत.
जनावरे दगावलेल्या किंवा वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी.
घरे पडलेल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून त्वरित घरकुल उपलब्ध करून द्यावे.
ओढे-नद्यांचा प्रवाह धोकादायक झाल्यामुळे त्यांच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी उन्हाळ्यातील कामांची मंजुरी आताच द्यावी.
शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट करावी व नवीन कर्ज कोणत्याही अटीशिवाय द्यावे.
कर्ज नसलेल्यांना सुद्धा सहानुग्रह अनुदान द्यावे.
विद्यार्थ्यांची फी माफ करावी.
बी-बियाणे खात्यामार्फत मोफत उपलब्ध करून द्यावेत.
शेतमालाला कायमस्वरूपी हमीभाव द्यावा.
पूर व अतिवृष्टीमुळे मृत्यू पावलेल्या व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये मदत व शासकीय नोकरीत समावेश करावा.
याशिवाय सर्व शेतकरी योजनांचा लाभ तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
काशीद यांनी सांगितले की, "सरकारने तातडीने मदत केली नाही तर शेतकरी उभा राहणे कठीण होईल. ही जबाबदारी शासनाने पार पाडली पाहिजे."
0 Comments