ड्रेनेजचे पाणी जलवाहिनीमध्ये; आराेग्याला धाेका; पोषम्मा चौक परिसरात दूषित पाणीपुरवठा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पोषम्मा चौक परिसरातील शंभो मारुती मंदिरासमोर दूषित पाणी येत असल्याची नागरिकांची तक्रार होती. या तक्रारीवरून एंडोस्कोपी कॅमेराद्वारे तपासणी करण्यात आली. यात ड्रेनेजचे पाणी जलवाहिनीच्या कुजलेल्या बेंडमधून पिण्याच्या पाइपलाइनमध्ये मिसळत होते.
महापालिकेने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेत, ड्रेजनेचे वॉल्व्ह बसवून दुरुस्ती केली.
महापालिकेच्या विभागीय कार्यालय दोनच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग १० मधील विडी घरकुल ग्रुप ई, पोषम्मा चौक परिसरातील शंभो मारुती मंदिरासमोर दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने महापालिकेने एंडोस्कोपी कॅमेराद्वारे जलवाहिनीची तपासणी केली. त्यावेळी पाण्याची पाइपलाइन गंजलेली व त्यात गाठी असल्याचे निदर्शनास आले.
पाइपलाइनच्या शेवटी तीन मीटरमध्ये चार टॅप कनेक्शनपैकी दोन बंद बूच व दोन चालू कनेक्शन आढळून आले. त्यापैकी एका कनेक्शनचे बेंड कुजलेले होते. हे घरगुती ड्रेनेज कनेक्शन जीर्ण झाले होते. या कुजलेल्या बेंडमधून पिण्याच्या पाण्याच्या पाइपमध्ये घाण पाणी येत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी पाणी पुरवठा निगेटिव्ह फिडींगने होत असल्यामुळे एंडोस्कोपी करताना जलवाहिनीच्या आत १२ मीटरपर्यंत कॅमेरा फिरविण्यात आला. त्यानंतर या दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी चार इंची वॉश आउट व्हॉल्व्ह बसवून दूषित पाणीपुरवठा बंद करण्यात आला.
सोलापूर शहरातील दूषित पाणी पुरवठा होणाऱ्या पाइपलाइनची एंडोस्कोपी कॅमेराद्वारे तपासणी करण्याच्या सूचना सर्व विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या. दूषित पाणी पुरवठा होत असल्यास ते पाइपलाइन बदलण्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल. जिथे दुरुस्ती शक्य आहे, तिथे दुरुस्ती केली जाईल.
- डॉ. सचिन ओम्बासे, आयुक्त, महापालिका, सोलापूर
0 Comments