कर्जमाफीच्या अटी रद्द करण्यासाठी पावसाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक; रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 15, 2026

कर्जमाफीच्या अटी रद्द करण्यासाठी पावसाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक; रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित

"शासनाच्या आश्वासनानंतर रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित"



पंढरपूर (कटूसत्य वृत्त) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, या प्रमुख मागणीसाठी पंढरपुरात सुरू असलेले आमदार रोहित पवार यांच्यासह २६ जणांचे अन्नत्याग आंदोलन रविवारी मध्यरात्रीपूर्वी स्थगित करण्यात आले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर हा तोडगा निघाला.

पावसाळी अधिवेशनापूर्वी शेतकरी प्रतिनिधी मंडळासह आमदार रोहित पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत कर्जमाफीतील अटींबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

शेतकरी शिष्टमंडळामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, किसान सभेचे सचिव अजित नवले, रविकांत तुपकर आदींचा समावेश असणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, "गेल्या काही वर्षांतील नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटांमुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यामध्ये घालण्यात आलेल्या अनेक अटींमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या त्रुटींबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवस संपर्क साधून माहिती घेतली आहे. विठ्ठलाच्या नगरीत शासनाने दिलेला शब्द खोटा ठरणार नाही, अशी आम्हाला अपेक्षा आहे."

आंदोलन स्थगितीच्या कार्यक्रमाला आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार रोहित पाटील, राजेंद्र पवार, प्रणव परिचारक, विकास लवांडे, नागेश फाटे, दीपक वाडदेकर यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आभार प्रदर्शन करताना विकास लवांडे यांनी, "हे आंदोलन संपलेले नसून केवळ स्वल्पविराम आहे. शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारले जाईल," असा इशारा दिला.

जिथून सुरुवात, तिथेच सांगता...

आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोरील नामदेव पायरी येथे अन्नत्याग आंदोलनास सुरुवात केली होती. रविवारी शिवतीर्थावर आंदोलन स्थगित केल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांसमवेत पुन्हा नामदेव पायरी येथे जाऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले, आरती केली आणि प्रसाद स्वीकारून आंदोलनाची सांगता केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages