सोलापूर महापालिकेवर महिलांचा 'घागर मोर्चा'
प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उन्हाचा पारा ४४ अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचताच सोलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न अधिकच तीव्र झाला असून, पाणीटंचाईच्या निषेधार्थ सोमवारी (दि.२० एप्रिल) प्रभाग ११ मधील महिलांनी महापालिकेवर 'घागर मोर्चा' काढत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे या मोर्चात सत्ताधारी भाजपचे नगरसेवकही सहभागी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सोलापूर शहरातील अनेक भागांत अद्याप सात ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी प्रचंड वाढली असताना महापालिका प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केला. रिकाम्या घागरी हातात घेऊन महिलांनी घोषणाबाजी करत महापालिकेकडे मोर्चा वळवला. "पाणी द्या, पाणी द्या; नाहीतर खुर्च्या खाली करा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
दरम्यान, महापालिकेच्या सभागृहात १४०० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेवर सादरीकरण आणि चर्चा सुरू असतानाच बाहेर नागरिकांचा आक्रोश उसळल्याचे चित्र दिसून आले. एका बाजूला कोट्यवधींच्या योजनांवर चर्चा, तर दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी महिलांची धावपळ, असा विरोधाभास प्रकर्षाने समोर आला. या मोर्चात सत्ताधारी भाजप नगरसेवकांनीही सहभाग घेत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
"प्रभागात गेली आठ-दहा दिवस पाणी नाही. यासंदर्भात झोन अधिकाऱ्यांना आणि सार्वजनिक आरोग्य अभियंत्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे वैतागलेल्या महिलांनी महापालिकेवर घागर मोर्चा काढला."

No comments:
Post a Comment