भारत–अमेरिका व्यापार कराराची सोलापूरात प्रतीकात्मक होळी
शेतकरी, व्यापारी व ग्रामीण अर्थव्यवस्थेस घातक असल्याचा आरोप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारत–अमेरिका व्यापार कराराच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी शहरात प्रतीकात्मक होळी आंदोलन करण्यात आले. प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले.
यावेळी कार्यकर्त्यांनी कराराच्या प्रतीची होळी करून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. “नरेंद्र झाले सरेंडर”, “पी.एम. इज कॉम्प्रोमाइज्ड” अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी करार मागे घेण्याची मागणी केली.
चेतन नरोटे यांनी पत्रकारांशी बोलताना आरोप केला की, अमेरिकेच्या दबावाखाली केंद्र सरकारने देशहिताशी तडजोड करणारा करार केला आहे. अमेरिकेतील कथित एपस्टाईन प्रकरणानंतर स्वतःची प्रतिमा वाचविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या करारामुळे शेतकरी, व्यापारी, वस्त्रोद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असे ते म्हणाले.
करारातील टॅरिफ रचनेवर प्रश्न उपस्थित करताना त्यांनी सांगितले की, अमेरिकेकडून भारतात निर्यात होणाऱ्या मालावर शून्य किंवा अत्यल्प शुल्क ठेवण्यात आले आहे, तर भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या मालावर १८ टक्के शुल्क आकारले जात आहे. पूर्वी हे शुल्क केवळ ३ टक्के होते, असा दावा त्यांनी केला. रशियन क्रूड तेल आयातीच्या कारणावरून अतिरिक्त दंडात्मक शुल्क लादण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.
करारानंतर काही कृषीपिकांच्या दरात घसरण झाल्याचे सांगत सोयाबीन, मका, कापूस आणि तूर उत्पादकांना मोठे नुकसान होत असल्याचा दावा नरोटे यांनी केला. मोठ्या प्रमाणावर आयात वाढल्यास देशांतर्गत उद्योग आणि रोजगारावर परिणाम होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी नगरसेवक नरसिंह आसादे, प्रदेश सचिव श्रीशैल रणदिरे, महिला अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे, युवराज जाधव, तिरुपती परकीपंडला, विवेक कन्ना, सुभाष वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment