राजेवाडी तलाव संदर्भाने सांगली जिल्ह्यावर पुन्हा अन्याय
सांगली जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी आक्रमक भुमिका घ्यावी .
सादिक खाटीक यांचे आवाहन .
आटपाडी (कटूसत्य वृत्त):-
राजेवाडी तलाव सातारा जिल्ह्याकडेच वर्ग करण्याच्या शासकीय पातळीवरून हालचाली सुरू असल्याचे वृत्त धक्कादायक व अन्यायी असल्याने सांगली जिल्ह्याशी तसेच सांगोला तालुक्याशी संबंधीत सर्व आमदार, खासदार महोदयांनी या विरोधात जोरदार आवाज उठवावा असे आवाहन आटपाडीचे सामाजीक कार्यकर्ते ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक यांनी पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर केले आहे .
राज्याचे जलसंपदा मंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील यांनी, म्हसवड मध्यम प्रकल्प अर्थात राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्याचा आदेश दोन वेळा दिल्याचे खानापूरचे आमदार सुहास बाबर यांनी प्रसार माध्यमात सांगीतले होते . या पार्श्वभूमीवर, राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करायचे सोडाच, उलट राजेवाडी तलाव सातारा जिल्ह्याकडेच वर्ग करण्याच्या शासकीय पातळीवरून हालचाली सुरू असल्याचे समजले आहे . या धक्कादायक वृत्ताने आटपाडी तालुक्यासह सर्वत्र खळबळ माजली आहे .
खानापूर आटपाडीचे आमदार श्री . सुहासभैय्या बाबर यांनी, मुंबई मंत्रालय येथे दि . ४ नोहेंबर रोजी ११ . ३० वाजता राज्याचे जलसंपदा मंत्री ना . राधाकृष्ण विखे - पाटील यांची तातडीने भेट घेऊन , राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्याचा दि . ११ जुन रोजी सांगलीच्या आढावा बैठकीत आपण आदेश दिला होता . तथापि हा तुमचा आदेश अंमलात आणायचे सोडून राजेवाडी तलाव सातारा सिंचन मंडळाकडे वर्ग करण्याचा आदेश जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साताऱ्यातील जलसंपदाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांना दिल्याचे निदर्शनास आणले होते. आमदार सुहास बाबर यांनी, मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांना , राजेवाडी तलावाच्या संदर्भातील सर्वंकष वस्तुस्थितीची माहिती करून देत, राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्याचा आदेश आपण दिल्याचे आणि अधिकाऱ्यांनी त्या आदेशाला दुर्लक्षीत केल्याची गंभीर बाब महोदयांच्या लक्षात आणून दिली होती .
या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री ना . राधाकृष्ण विखे - पाटील यांनी, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणेचे कार्यकारी संचालक श्री . हणमंतराव गुणाले यांना तातडीने फोन लावून, राजेवाडी तलाव सातारा सिंचन मंडळ साताऱ्याकडे वर्ग करण्याची सुरू असलेली प्रकिया थांबवण्याचा आणि राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचा आदेश कार्यकारी संचालक श्री . हणमंत गुणाले यांना मंत्री महोदयांनी त्याचवेळी अर्थात ४ नोहेंबर रोजी दिला होता . १० जुन २५ रोजी सांगलीच्या बैठकीत आणि ११ नोहेंबर २०२५ रोजी मंत्रालयातून फोनवरून,या दोन्ही वेळेस राज्याचे जलसंपदा मंत्री ना . राधाकृष्ण विखे - पाटील यांनी राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्याचा आदेश दिल्याचे खानापूरचे आमदार सुहासभैय्या बाबर यांनी प्रसार माध्यमातून स्पष्ट केले होते .
सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील माण, आटपाडी आणि सांगोला तालुक्याशी १४५ वर्षापासून संबंधीत असलेल्या राजेवाडी तलावाचे मुख्य व्यवस्थापन, सातारा जिल्ह्यातील राजेवाडी पासून १०० किमीवरील फलटण येथे होते व आजही आहे . पाण्याचे नियोजन, व्यवस्थापन इतर काही बाबींसाठी ते सांगोला, आटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलावाच्या लाभार्थी शेतकऱ्यांना त्रासाचे होते. टेंभू, म्हैशाळ योजनांचे पाणी सांगोला, मंगळवेढ्याकडे जाणार आहे . त्याचेही व्यवस्थापन सांगली जिल्ह्याकडेच आहे . राजेवाडी तलावातून आटपाडी तालुक्यातील १३८७ हेक्टर क्षेत्राला आणि सांगोला तालुक्यातील २६६२ हेक्टर क्षेत्राला अशा एकूण ४०४९ हेक्टर क्षेत्राला अधिकृत पणे पाणी दिले जाते .
याउपर १४५ वर्षातला, एखादा, दुसरा रितसर परवान्याचा अपवाद वगळल्यास राजेवाडी तलावाचे प्रचंड पाणी, माण तालुका अधिकृतरित्या घेतच नाही. पाणी उपसा करणारे डिझेल इंजिन अस्तित्वात आलेनंतर आणि नंतर आलेल्या पाणी उपशाच्या विद्यूत मोटारीतून जवळ जवळ साठ - पासष्ट वर्षे राजेवाडी तलावाच्या बुडीत क्षेत्रा जवळच्या, बॅक वॉटर लगतच्या माण तालुक्यातल्या अनेक गावातल्या शेकडो शेतकऱ्यांनी, शेकडो विद्यूत मोटारीद्वारे अनधिकृतपणे प्रचंड पाणी उपसा केला आहे . आजही ते करीत आहेत . राजेवाडी तलाव निर्मितीच्या सुरुवातीच्या व्यवस्थापन नियमावलीत पाणी उपशा संदर्भातले निर्देश नसल्याने, राजेवाडी तलावाचे पाणी उपसा करणारांना अधिकृतपणे परवाने देता आले नाही . हा अधिकाऱ्यांचा, मतलबी कावा, अनधिकृत शेकडो मोटारींच्या, अनधिकृत प्रचंड पाणी उपशाकडे दुर्लक्ष करीत आला आहे . या पाणी उपसा करणारांना अधिकृत उपसा सिंचनचे पाणी परवाने दिले गेले नाहीत आणि पाणी उपसा करणारांनीही ते परवाने मिळविले नाहीत . वर्षानुवर्षांपासून, प्रत्येक वर्षी जवळ जवळ वर्षभर चालणारा प्रचंड पाणी उपसा रोखला गेला नाही . पाणी उपसा करणाऱ्यांवर कसलीही कारवाई केली गेली नाही . वर्षानुवर्षे हा अंधाधुद कारभार सुरु ठेवणारांकडूनच राजेवाडी तालुका सातारा जिल्ह्याच्या व्यवस्थापना खालीच असला पाहीजे, याचा वर्षानुवर्षे आटापीटा चालु आहे . हे दुर्दैवी आहे . या घोर अन्याया विरोधात सांगली जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या आमदार खासदार महोदयांनी तसेच सांगोला तालुक्याशी संबंधीत आजी माजी आमदार, खासदार महोदयांनी जोरदार आवाज उठवावा. आणि हा अन्याय मोडून काढावा . असेही आवाहन सादिक खाटीक यांनी केले आहे .

0 Comments