शालार्थ आयडीसाठी एक लाखाची लाच घेताना शिक्षण उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
पुणे (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर जिल्ह्यातील एका माध्यमिक शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या महिलेचा शालार्थ आयडी मंजूर करून वेतन सुरू करून देण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे यांना आज एसीबीने रंगेहाथ अटक केली.
तक्रारदाराने 17 नोव्हेंबर 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार दिली होती. तक्रारदाराची पत्नी 2016 पासून शालार्थ आयडी नसल्याने विना वेतन कार्यरत होती. यासाठीचा आयडी प्रस्ताव 16 जून 2025 रोजी पुण्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात सादर करण्यात आला होता. सदर प्रस्ताव ‘ई-ऑफिस’ मार्गे मंजूर करण्यासाठी आरोपी उपनिरीक्षकाने १ लाखाची लाच मागितली होती.
तक्रारीनंतर 17 आणि 21 नोव्हेंबर रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. 21 नोव्हेंबरच्या पडताळणीदरम्यान आरोपीने तक्रारदाराच्या पत्नीचा शालार्थ आयडी मंजूर करून देण्यासाठी लाच स्वीकारण्याची तयारी असल्याचे स्पष्ट झाले.
आज, 25 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.21 वाजता, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील स्वतःच्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून १ लाखांची रक्कम स्वीकारताच एसीबीने आरोपीला रंगेहाथ पकडले.
आरोपी रावसाहेब मिरगणे यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया बंडगार्डन पोलिस ठाण्यात सुरू आहे.
0 Comments