मोहोळच्या विकासासाठी निधी मंजूर करून आणण्याचे काम माझं
तुम्ही सर्वजण फक्त सांगा मोहोळचा कोणता विकास करायचा
पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे मोहोळ शहरवासीयांना ठोस आश्वासन
भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांच्यासह सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा मोहोळमध्ये शुभारंभ
मोहोळ (साहिल शेख):- मोहोळ तालुक्यासह जिल्ह्यामध्ये माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने भाजपाची ताकद वाढली आहे. ज्येष्ठ नेते राजन पाटील यांचे संघटनकौशल्य आणि मोहोळ मतदारसंघाच्या विकासाबद्दल त्यांच्या मनात असली तळमळ पाहूनच पक्षश्रेष्ठींनी त्यांना यापुढील काळात विकासात्मक प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याबरोबर मोहोळ तालुक्याच्या उर्वरित विकासाचा टप्पा पूर्ण करण्याबाबत सहकार्य करण्याचे अभिवचन दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत एकदिलाने कार्यरत राहून भारतीय जनता पक्षाला यश मिळवून द्या. आणि त्यानंतर तुम्ही फक्त काय विकास करायचा आहे हे सांगा ते मंजूर करून आणण्याचे काम मी नक्की करणार आहे " असे ठोस आश्वासन राज्याचे ग्रामविकास पंचायत राज खात्याचे कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांनी मोहोळ येथे दिले. मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार शितल सुशील क्षीरसागर व अन्य दहा प्रभागातील वीस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये नामदार गोरे मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील हे होते तर व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितल सुशील क्षीरसागर, भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्र्यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून,महबूब सुभानी दर्गा,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,शक्ती देवी यांना अभिवादन करून रॅली काढत मोहोळ शहराचे ग्रामदैवत श्री नागनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये नारळ फोडून नागनाथ मंगल कार्यालय येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर प्रकाश चवरे, सतीश काळे, प्रतापसिंह गरड, नागनाथभाऊ शिरसागर,सुशिल क्षिरसागर, सोमेश शिरसागर विकास वाघमारे, अंकुश अवताडे, रमेश माने, शंकराव वाघमारे, बाळासाहेब गायकवाड ,आदींसह तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीबरोबर देशाला महासत्ता बनवण्यासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवले आहेत त्यामुळे अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्हा प्रत्येक पदाधिकाऱ्यांना अभिमान वाटायला हवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विकासात्मक प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत ठेवल्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाच्या कालावधीत आम्ही अनगरकर पाटील परिवाराने केलेला भाजप प्रवेश निश्चित अविस्मरणीय बाब आहे.मोहोळ शहराचा रखडलेला विकास जर करून घ्यायचा असेल,तर देशामध्ये आणि राज्यामध्ये भाजपाचेच डबल इंजिन सरकार आहे.आता मोहोळ नगर परिषदेच्या माध्यमातून तिसरे इंजन त्याला जोडून शहराच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढावा.
राजन पाटील
ज्येष्ठ भाजप नेते मोहोळ
चौकट
कामे बोलून होत नसतात त्यासाठी काम करावं लागतं... चकाकणारे सगळे सोने नसते
फक्त बोलून विकास होत नाही.त्यासाठी कामे करावी लागतात.सगळ्याच चांगल्या दिसणाऱ्या गोष्टी सुंदर असतात असे नाही.सोन्यासारखं दिसणारे बेन्टेक्स फक्त चमकण्याचा आव आणतं म्हणून ते सोने नसतं." असा खुमासदार टोला आपल्या भाषणातून नामदार जयकुमार गोरे यांनी भाजपला विरोध करणाऱ्या तालुक्यातील अतिहुशार चाणाक्ष नेत्यांना लावल्यानंतर सभास्थळी पालकमंत्र्यांच्या भाषण कौशल्याला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भरभरून दाद दिली.

0 Comments