Hot Posts

6/recent/ticker-posts

निर्भय आणि निपक्षपाती वातावरणात निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज ; जिल्हाधिकारी

निर्भय आणि निपक्षपाती वातावरणात निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज ; जिल्हाधिकारी 

सोलापूर, दि.21:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची संपूर्ण तयारी झालेली असून निर्भय, नि:पक्षपातीपणे व शांततामय वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राजकीय पक्ष व नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी भोसले बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिका आयुक्त दिपक तावरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले पुढे म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा निवडणूक कार्यक्रम नुसार दिनांक 27 सप्टेंबर 2019 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 4 ऑक्टोबर तर नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्याचा दिनांक 5 ऑक्टोबर असून उमेदवारी अर्ज मागे  घेण्याचा दिनांक 7 ऑक्टोबर आहे. तसेच मतदानाचा दिनांक 21 ऑक्टोबर असून 24 ऑक्टोबर  रोजी मतमोजणी होणार असून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 27 ऑक्टोबर 2019 असा असल्याची माहिती त्यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघात एकूण 34 लाख 21 हजार 324 इतके मतदार असून लोकसभा निवडणूक 2019 पेक्षा 24 हजार 611 अधिकचे मतदार नोंदणी झालेली आहे. विधानसभा निवडणूक 2014 मध्ये मतदानाची एकूण टक्केवारी 67.2 इतकी होती, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये 61. 27 टक्के मतदान झाले होते, असे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगून एकूण मतदारांमध्ये 13 हजार 282 हे दिव्यांग मतदार असून  दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघासाठी 3 हजार 521 मतदान केंद्र आहेत. तर 5 हजार 650 बॅलेट युनिट, 7 हजार 610 कंट्रोल युनिट व 5 हजार  90  मशीन उपलब्ध झालेल्या असून मशीनची प्रथम स्तरीय तपासणी पूर्ण झालेली  असल्याची माहिती डॉ. भोसले यांनी दिली. या निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी 20 हजार  मनुष्यबळाची आवश्यकता असून प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आदर्श आचारसंहिता व इतर निवडणूक विषयक विविध समस्या मांडून त्याबाबत प्रशासनाने त्वरीत कार्यवारी  करण्याचे आवाहन केले.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती भोसले यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने  स्थापन करण्यात आलेल्या विविध पथकांच्या नोडल अधिका-यांची  माहिती देऊन त्यांना त्यांच्या जबाबदा-याबाबत ही अवगत केले.
Reactions

Post a Comment

0 Comments