कन्हेरगावचे माजी उपसरपंच दत्तात्रय माने यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील कन्हेरगाव येथील माजी उपसरपंच तथा हरितक्रांती पाणीपुरवठा संस्थेचे माजी चेअरमन दत्तात्रय गोपाळ माने (वय ७०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कन्हेरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दत्तात्रय माने यांनी कन्हेरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची जबाबदारी सांभाळताना गावाच्या विकासासाठी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. तसेच कन्हेरगाव येथील हरितक्रांती पाणीपुरवठा संस्थेच्या चेअरमनपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. सामाजिक कार्य, गावविकास तसेच पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी योगदान दिले.
शांत, मनमिळावू आणि सामाजिक जाणीव असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. त्यांच्या निधनाने कन्हेरगावच्या सामाजिक व ग्रामविकास क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. कन्हेरगाव येथील पृथ्वीराज माने तसेच नगरविकास विभागाचे समन्वयक बालाजी माने यांचे ते वडील होत.
दत्तात्रय माने यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

No comments:
Post a Comment