जिल्हा परिषदेचे स्वतंत्र ॲप; आरोग्य केंद्रे, उपचार, सुविधा व योजनांची माहिती मोबाईलवर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 5, 2026

जिल्हा परिषदेचे स्वतंत्र ॲप; आरोग्य केंद्रे, उपचार, सुविधा व योजनांची माहिती मोबाईलवर

 जिल्हा परिषदेचे स्वतंत्र ॲप; आरोग्य केंद्रे, उपचार, सुविधा व योजनांची माहिती मोबाईलवर





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सेवा आणि सुविधांची माहिती घरबसल्या सहज उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत स्वतंत्र ॲप्लिकेशन विकसित करण्यात येणार आहे. या ॲपद्वारे जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची माहिती, उपलब्ध उपचार व सुविधा, संपर्क क्रमांक तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती नागरिकांना एका क्लिकवर मिळणार आहे. आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

प्रस्तावित ॲपमध्ये जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह आरोग्य विभागाशी संबंधित आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना आपल्या परिसरातील उपलब्ध आरोग्य सुविधा सहज शोधता याव्यात, तसेच आवश्यकतेनुसार संबंधित आरोग्य केंद्राशी संपर्क साधता यावा, या उद्देशाने ॲप विकसित करण्यात येणार आहे.

बैठकीत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या STEMI प्रकल्पाचा आढावाही घेण्यात आला. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ७ हजार ९४७ ईसीजी तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी १६ रुग्णांमध्ये हृदयविकाराचे निदान झाले. या रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार देण्यात आले.

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सध्या १ हजार ५७१ क्षयरुग्ण उपचाराखाली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. संशयित क्षयरुग्णांचे लवकर निदान व्हावे, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर येणाऱ्या संशयित रुग्णांची एक्स-रे तपासणी करण्याच्या सूचना सभापती सावंत यांनी दिल्या

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधे आणि आरोग्यविषयक साहित्याचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आरोग्य विभागाने योग्य नियोजन करावे, अशा सूचना सावंत यांनी दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांना आवश्यक सेवा वेळेत उपलब्ध होण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीस आरोग्य समितीचे सदस्य व्यंकटराव भालके, सविता कोकाटे, संगीता दुधाळ, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, मुख्यालय अधिकारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages