शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी - किरणजीत सिंग - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 21, 2026

शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी - किरणजीत सिंग

 शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी - किरणजीत सिंग

पिंपरी येथे "शहीद भगत सिंग आणि आर्य समाज" विषयावर व्याख्यान





पिंपरी पुणे (कटूसत्य वृत्त):-  शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी होते. बंदूक आणि तलवारीच्या जोरावर, ब्रिटिशांना भारतातून घालवून खरे स्वातंत्र्य मिळणार नाही, तर पूर्ण व्यवस्थाच बदलली पाहिजे. आत्ताचे स्वातंत्र्य हे भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या क्रांतीकारकांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य नाही. त्यांना जातवाद, धर्मवाद, प्रांतवाद, भ्रष्टाचार मान्य नव्हता. आता होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांमुळे ते व्यथीत झाले असते. शहीद भगत सिंग यांच्या तीन पिढ्यांना बलिदानाचा इतिहास आहे. २७ सप्टेंबर १९०७ साली भगत सिंग यांचा जन्म झाला. बालपणी त्यांच्यावर गुरुगोविंद सिंग, आर्य समाज संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई यांचा प्रभाव होता. आत्ताच्या पिढीने अशा महान क्रांतिकारकांचे चरित्र अभ्यासावे आणि महर्षी दयानंद सरस्वती यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आर्य समाजाचे विचार पुढे न्यावे असे आवाहन भगत सिंग यांचे पुतणे किरणजीत सिंग यांनी पिंपरी येथे केले.

    शुक्रवारी (दि.२० मार्च) पुणे, पिंपरी कॅम्प येथील आर्य समाज भवन येथे "शहीद भगत सिंग आणि आर्य समाज" या विषयावर सिंग यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी पिंपरी आर्य समाज अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी, मंत्री हरेश तिलोकचंदानी, सचिव संजय वासवानी, समन्वयक उत्तम दंडीमे, डॉ. नयनकुमार आचार्य, नलिनी देशपांडे, राजाभाऊ गोलांडे, मारुती भापकर, अतुल आचार्य, सुहास पोफळे आदी उपस्थित होते.

   शहीद भगत सिंग १२ वर्षाचे असताना ब्रिटिश सरकारने १३ एप्रिल १९१९ रोजी मार्शल लॉ लागू केला. त्यावेळी जालियनवाला बाग येथे जनरल डायर याने हजारो निरपराध नागरिकांवर बेछूट गोळीबार करून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर भगत सिंग हे लाहोर येथून जालियनवाला बाग येथे आले आणि तेथील माती स्वतःच्या घरी घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची शपथ घेतली. कानपूर येथे एका वृत्तपत्रात काम करीत असताना चंद्रशेखर आझाद आणि इतर क्रांतीकारकांशी त्यांचा संपर्क झाला. ब्रिटिशांनी नेमलेल्या सायमन कमिशनमध्ये एकही हिंदू प्रतिनिधी नाही. याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये लाला लजपतराय सारख्या ज्येष्ठ क्रांतीकारकांचा बळी गेला. या घटनेमुळे भगतसिंग खूप व्यथीत झाले.

   बलिदानाशिवाय संघर्ष पूर्ण होणार नाही. एका भगत सिंगाला फाशी दिली, तरी लाखो भगत सिंग जन्म घेतील आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देतील यावर त्यांचा विश्वास होता. भगत सिंग, सुखदेव, राजगुरू या क्रांतिकारकांना २४ मार्च १९३१ रोजी फाशी देण्याचे आणि त्यांच्या बरोबरच्या इतर १५ क्रांतीकारकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे देशभर तीव्र आंदोलन सुरू झाले. यानंतर ब्रिटिश सरकारने घाबरून भगत सिंग यांना एक दिवस अगोदरच फाशी दिली. फाशी देण्यापूर्वी भगत सिंग यांच्या आईला त्यांची भेट घेऊ दिली नाही आणि इतर कुटुंबीयांना अनेक अटी घातल्या. त्यावेळी पुण्यातून शहीद क्रांतीकारक राजगुरू यांच्या मातोश्री पार्वतीबाई लाहोर तुरुंगात या क्रांतीकारकांना भेटण्यासाठी आल्या होत्या. परंतु भगत सिंग यांच्या आईला भेटू दिले नाही याच्या निषेधार्थ राजगुरू यांच्या आई देखील राजगुरू यांना भेटल्या नाही. देश प्रेमासाठी आणि एका मातेचा सन्मान राखण्यासाठी पार्वतीबाई या मातेने राजगुरू या स्वतःच्या मुलाची अंतिम भेट घेतली नाही. पार्वतीबाई या राष्ट्रप्रेमी मातेला नमन करण्यासाठी आणि त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी पुणे मुक्कामी आलो आहे असे भावूक उद्गार किरणजीत सिंग यांनी काढले. 

    प्रास्ताविक, स्वागत सुरेंद्र करमचंदानी, सूत्रसंचालन उत्तम दंडीमे आणि आभार अतुल आचार्य यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages