सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; १९ जूनला करमाळ्यात घंटानाद आंदोलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 16, 2026

सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; १९ जूनला करमाळ्यात घंटानाद आंदोलन

सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; १९ जूनला करमाळ्यात घंटानाद आंदोलन



करमाळा, (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक संकटाच्या गर्तेत अडकला असून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी १९ जून २०२६ रोजी करमाळा तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय एकदिवसीय घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्ष व क्रांतिकारक शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
या संदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते व क्रांतिकारक शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल घुमरे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रासपचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, क्रांतिकारक शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल घुमरे, रयत क्रांती संघाचे अजय बागल, ज्ञानेश्वर बनसोडे, सागर अंबारे, अमोल बागल, अशोक नवघरे, तानाजी शिंदे, शांतीलाल मोरे, राम धायतोंडे, भगवान डोंबाळे, शंकर सुळ, विष्णू राऊत यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील शेतकरी सध्या वाढता उत्पादन खर्च, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, शेतीमालाला न मिळणारा हमीभाव तसेच वाढत्या कर्जबाजारीपणामुळे गंभीर आर्थिक अडचणीत सापडला आहे. खत, बियाणे, औषधे आणि मशागतीचा खर्च प्रचंड वाढल्याने शेती करणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन आर्थिक दिलासा देणे गरजेचे असल्याचे आंदोलकांनी नमूद केले आहे.
शेतकरी नेते राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर तसेच आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलने केली, मात्र शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नसल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली. निवडणुकीपूर्वी दिलेल्या सरसकट कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी तसेच पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वेळेत व योग्य नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागण्यांसाठी शुक्रवार, १९ जून रोजी सकाळी ११.३० वाजता करमाळा तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय घंटानाद आंदोलन करण्यात येणार असून शासनाने शेतकरी हिताच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
"नको अटी, नको शर्ती; आम्हाला हवी सरसकट कर्जमुक्ती" या घोषणेसह शेतकरी संघटना आंदोलनासाठी सज्ज झाल्या आहेत.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages