Hot Posts

6/recent/ticker-posts

डिकसळमधील म्हैसाळच्या बंदिस्त पाईपलाईनची भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केली पाहणी

 डिकसळमधील म्हैसाळच्या बंदिस्त पाईपलाईनची भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केली पाहणी 


३० ऑगस्टपर्यंत सर्व कामे पूर्ण करून पाणी सोडण्यात येणार
घेरडी दि.२६(क.वृ.): १३ कि.मी.ची बंदिस्त पाईपलाईन, नऊ कोटीचा निधी शिल्लक, पण अकार्यक्षम ठेकेदारामुळे अधिकाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने कामात दिरंगाई लागून डिकसळकरांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकारी व ठेकेदाराला भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी चांगलाच घाम फोडला. परिसरातील लोहगाव जवळ्या कडे जाणाऱ्या बंदिस्त पाईपलाईनचे काम ठेकेदाराने रखडवले आहे. अशा या कामाची पाहणी  भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केली.
पुराचे अतिरिक्त पाणी जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशानुसार टेंभू, म्हैसाळ व निरा कालवा यांच्या माध्यमातून दुष्काळी भागाला देण्याचे सक्त आदेश आहेत . सांगोला तालुक्यात म्हैसाळ, टेंभू, नीरेचे पाणी आलेले आहे .पण तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी कामे रखडल्याने हे पाणी अनेक गावांना पोहोचू शकत नाही. तालुक्यातील डिकसळ गावाला तसेच पुढे लोहगाव जवळ्याकडे तेरा किलोमीटरची बंदिस्त पाईप लाईन आहे व त्याच्या पुढे दहा किलोमीटर इतकी पाईपलाईन विखुरलेली आहे. या तेरा किलोमीटर मधील कामे मोठ्या प्रमाणात रखडल्याने लोकप्रतिनिधींनी याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्या अनुषंगाने काल १३ किलोमीटर मध्ये रखडलेल्या कामाची पाहणी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केली. बऱ्याच ठिकाणी लोखंडी सॉकेट जोडण्या रखडल्याने ही पाईपलाईन अपूर्णावस्थेत आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सहाय्यक अभियंत्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची रखडलेल्या कामाबाबत चांगलीच कानउघडणी केली. येत्या चार ते पाच दिवसात ही सर्व कामे मार्गी लावतो असे सहाय्यक कार्यकारी अभियंता चोपडे यांनी सांगितले. यावेळी खरेदी-विक्री संघाचे संचालक तुकाराम भुसनर, सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, सरपंच शशिकला बाबर, मधुकर बाबर ,भाजपा अध्यक्ष विलास निळे, उपाध्यक्ष संजय निळे, आबासो करांडे ,अमृत निळे, शिवसेनेचे रावसाहेब निळे ,बाळासाहेब कोरे यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीकांत देशमुख यांचा डिकसळ ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच शशिकला बाबर व मधुकर बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Reactions

Post a Comment

0 Comments